अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उद्या सकाळी ११ पर्यंत याबाबतचे पत्र लटके यांना देण्यात यावं असं न्यायालयाने म्हटलं आहे. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावलं असून तुमच्याकडे विशेषाधिकार असताना अशी प्रकरणं आमच्याकडे येता कामा नयेत असं सांगितलं आहे. न्यायालयाने हा निकाल दिल्यानंतर ऋतुजा लटके यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया दिली.
ऋतुजा लटके म्हणाल्या, “आताच आम्ही उद्धव ठाकरे यांना भेटून आलो आहोत. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. त्यांनी सांगितल की तुम्ही जोषाने आणि मनात कसलीही शंका न ठेवता निवडणुकीला सामोरे जा, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत.”
न्यायालयाच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना नेते अनिल परब यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
ऋुतुजा लटकेंनी ही निवडणूक लढवू नये यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न केले गेले – अनिल परब
अनिल परब म्हणाले, “आपणास माहीत आहे की रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर शिवसेनेने त्यांची पत्नी ऋुतुजा रमेश लटके यांची उमेदवारी जाहीर केली होती. अतिशय साधं हे प्रकरण होतं. परंतु ऋुतुजा लटके यांनी ही निवडणूक लढवू नये. यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न केले गेले. खरंच सगळ्याबाबी अतिशय स्पष्ट होत्या. कायद्यातील तरतुदी सरळ होत्या. त्यांना ज्या तरतुदी लागू पडतात. एक महिनाचा त्यांचा नोटीस किंवा एक महिन्याचा त्यांचा पगार. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची चौकशी नाही आणि त्यांची कुठलीही रक्कम देय त्यांना लागत नाही. इतक्या सरळ तरतुदी असताना देखील या गोष्टींसाठी आम्हाला उच्च न्यायालयात जावं लागलं ही दुर्दैवी बाब आहे.”
तर “एका सामान्य कर्मचाऱ्याच्या राजीनाम्याला एवढे महत्त्व का दिले जात आहे. उलट एका कर्मचाऱ्याला निवडणूक लढवायची आहे, तर तुम्ही त्याचा राजीनामा स्वीकारायला हवा. हे प्रकरण इथपर्यंत यायलाच नको होता,” असेही न्यायालयाने पालिकेला सुनावले. सुनावणीदरम्यान राजकीय दबावापोटीच राजीनामा थांबवण्यात आल्याचा आरोप यावेळी ऋतुजा लटके यांच्यावतीने करण्यात आला होता. तर राजीनाम्याची योग्य प्रक्रिया अवलंबली नसल्याचा युक्तिवाद पालिकेने आज केला होता.