भारतीय जनता पार्टीच्या माघारीनंतर एकतर्फी झालेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी एकतर्फी विजय मिळवला. शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाचे नवीन नाव, मशाल चिन्हावर विजय संपादन केल्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेला बळ प्राप्त झाले आहे. मात्र या निवडणुकीमध्ये भाजपाने नोटाचा प्रचार करुन रडीचा डाव खेळल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. “भाजपा आणि मिंधे गटाने एवढे सगळे उपद्व्याप करूनही जनता ना ‘नोटां’ना भुलली ना ‘नोटा’च्या भुलभुलैयाला,” असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांना या विजयानंतर लक्ष्य केलं आहे.
नक्की वाचा >> Uddhav Thackeray vs BJP: “ते पाप सध्याच्या कंस मामांनी केले”, फडणवीसांचा उल्लेख उद्धव ठाकरे म्हणाले, “कोणाच्या बापास…”
भाजपाने मिंधे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा निशाणा साधला
“अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जसा लागायचा तसाच लागला. भडकत्या मशालीवर विरोधकांनी गुळण्या टाकून विझविण्याचा प्रयत्न केला, पण मर्दांच्या हातातील मशालच ती. विझली नाहीच. उलट शिवसेनेचे तेज अधिक प्रकाशमान केले. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके ६६ हजार ५३० एवढी दणदणीत मते मिळवून विजयी झाल्या. देशातील पाच राज्यांतील सात ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या, पण सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते ते अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीकडे. कडवट, निष्ठावान आमदार रमेश लटके यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीच्या आधी मिंधे गट शिवसेनेतून बाहेर पडला. भाजपाबरोबर सरकार स्थापन करून त्यांनी शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेतले. म्हणजे भाजपाने मिंधे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा निशाणा साधला,” असा टोला उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावला आहे.
…मुंबईत आवाज आणि गर्जना कोणाची याचा फैसला…
“धनुष्यबाण गोठवून भाजपा व त्यांच्या मिंध्यांना विकृत आनंद मिळाला तरी मुंबईची जनता मात्र शिवसेनेच्या पाठीत झालेले घाव पाहून खवळून उठली. हाती मशाल हे चिन्ह घेऊन नव्या लढ्यासाठी सज्ज झाली. जनता जनार्दनाचा हा संताप पाहून भाजपा मिंधे गटाचे उमेदवार कोणी मुरजी पटेल यांना माघार घ्यावी लागली. महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, माणुसकी अशा शब्दांच्या टिचक्या मारून भाजपाने माघार घेतली होती ती फक्त मुंबईत पहिल्याच निवडणुकीत बेअब्रू होऊ नये म्हणून. मुळात अंधेरी पोटनिवडणूक आपणास लढायची आहे, असा वाद निर्माण करून भाजपापुरस्कृत मिंधे गटाने धनुष्यबाणावर दावा लावला व निवडणूक आयोगाने परंपरा, इतिहास, खरे-खोटेपणाचे भान न ठेवता शिवसेना हे नाव व धनुष्यबाणच गोठवले. ही गोठवागोठवी करून भाजपा व त्यांच्या मिंध्यांनी निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला. आमची मनापासून इच्छा होती, भाजपा व त्यांच्या मिंधे गटाचे उमेदवार या निवडणुकीत उतरायलाच हवे होते. म्हणजे मुंबईत आवाज आणि गर्जना कोणाची याचा फैसला लागला असता,” असंही उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे.
कायद्यानुसार ‘नोटा’चा प्रचार करता येत नाही
“अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी म्हणून ऐक्य राखले. शिवसैनिकांबरोबर दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते मनापासून कामास लागले. मुस्लिम समाज असेल नाहीतर ख्रिस्ती बांधव, सगळेच मतदानास उतरले. मराठी जनांची एकजूट तर अभेद्यच राहिली. हृदयात धनुष्यबाण आणि हाती मशाल असे चित्र दिसले. दुसरीकडे भाजपा आणि मिंधे गटाने माघारीचे नाटक केले, पण प्रत्यक्षात ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले. माघारीनंतरही त्यांच्या अंगातले किडे वळवळतच होते. त्यातूनच लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे, असे प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केले. वास्तविक, कायद्यानुसार ‘नोटा’चा प्रचार करता येत नाही. ‘नोटा’ हा पूर्णपणे ऐच्छिक विषय आहे. तरीही ‘नोटा’चा प्रचार केला गेला. लोकांनी मतदान केंद्रांवर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे यासाठी काही ‘खोकी’ खर्चण्यात आली. त्यामुळे खोके सरकार आपल्या नामकरणास पुरेपूर जागले,” असा टोला उद्धव ठाकरे गटाने शिंदे आणि भाजपाला लगावला आहे.
मिंध्यांच्या बुडास मशालीचे चटके बसले असते
“निवडणूक ग्रामपंचायतीची असो नाही तर विधानसभेची, खोक्यांशी नाते कायम ठेवायचे असे या मंडळींनी ठरवले आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीतही तेच झाले. येथे ‘नोटा’साठी नोटा वापरल्या गेल्या. एकूण मतदानापैकी १२ हजार ८०६ मते ‘नोटा’ या पर्यायाला मिळाली. अर्थात, एवढे सगळे उपद्व्याप करूनही जनता ना ‘नोटां’ना भुलली ना ‘नोटा’च्या भुलभुलैयाला! ‘नोटा’ला झालेले मतदान ही भाजपा व मिंधे गटाची मळमळ होती. मतदारांनी मात्र ऋतुजा लटके यांच्या पारड्यात भरभरून मतदान केले आणि भाजपा-मिंध्यांचे कारस्थान उधळून लावले. या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमी होता. पण भाजपा किंवा लाचार मिंधे गटाचा उमेदवार असता तर जनता अधिक जोमाने व त्वेषाने मतदान केंद्रावर पोहोचली असती. मतदानाचा आकडा ६० टक्क्यांवर गेला असता व मिंध्यांच्या बुडास मशालीचे चटके बसले असते. अर्थात उद्याच्या मुंबई, ठाणे, महानगरपालिकेत जनतेचा कौल कोठे आहे त्याची ही नांदी आहे. ‘मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार ते फक्त ईश्वरालाच ठाऊक,’ असे गमतीचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केले. पेच व कारस्थाने करणाऱ्यांना सोयीनुसार ईश्वर आठवतो हेच खरे! पण ईश्वराचे नाव घ्या नाही तर आणखी कोणाचे, मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा उतरविणे कोणाच्या बापास जमणार नाही,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.
आव्हानांचे घाव परतवून लावण्यास तयार
“शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लाभले आहे. त्यामुळे हाती मशाल घेऊन शिवसेना तुमच्या छाताडावर पाय देऊन उभीच राहील. मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील व कोणत्याही वेळी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल, अशा हालचाली राजकीय भूगर्भात सुरू आहेत याची मिंधे गटास कल्पना नाही. आम्ही मात्र कोणत्याही मैदानात उतरून आव्हानांचे घाव परतवून लावण्यास तयार आहोत. अंधेरीच्या पोटनिवडणुकीचा निकाल तेच सांगतोय. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यावर शिवसेना खचेल, हतबल होईल असे ज्यांना वाटत होते त्यांचे डोळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील ‘मशाली’च्या विजयी भडक्याने दिपले आहेत. ‘मशाली’च्या पहिल्या विजयाने मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली आहे. तथापि, राज्याची जनता मात्र आज पुन्हा दिवाळी साजरी करीत आहे,” असं लेखात म्हटलं आहे.
…पण शत्रूने वार वर्मी बसण्याआधीच रणातून पळ काढला
“दुष्मनांना कात्रजचा घाट दाखविण्यासाठी शिवरायांनी मशालीचाच वापर केला होता. तो इतिहास जरा आमच्या विरोधकांनी समजून घेतला पाहिजे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या रणात उतरून ज्या शिवसैनिकांनी, मतदारांनी शिवसेनेस विजय मिळवून दिला त्यांचे आभार मानायला आमच्याकडे शब्द नाहीत. आम्ही त्या शिवसेनाप्रेमींना साष्टांग दंडवत घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान राखल्याबद्दल लाख लाख धन्यवाद देत आहोत. आम्ही समोरून वार करणारे आहोत, पण शत्रूने वार वर्मी बसण्याआधीच रणातून पळ काढला. अशा पळपुट्यांनी विजयी मशालीवर उगाच गुळण्या टाकण्याचे प्रयत्न करू नयेत. विजयाची ही मशाल अशीच पेटत राहील! विरोधकांची ‘बुडे’ जाळत राहील! राजकीय चिता पेटवत राहील,” असा उल्लेख लेखाच्या शेवटी आहे.