मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. श्रीनिवास यांनी गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला असून ते १९९१ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या ते धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. श्रीनिवास यांनी नगर नियोजन आणि शहरी गृहनिर्माण (नूतनीकरण), वित्त, शहरी पायाभूत प्रकल्प, संरचना, नियोजन आणि अंमलबजावणी यासारख्या महत्वाच्या पायाभूत विभागांमध्ये सर्वोच्च पदे भूषवली आहेत. तसेच, मेगा गृहनिर्माण प्रकल्प उभारणीमध्ये मोलाचा हातभार लावला आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय निधी एजन्सी आणि जागतिक कोर्पोरेट्स संस्थांमध्येही सहभाग घेतला आहे.

बेस्टच्या महाव्यवस्थापकीय पदी असलेले विजय सिंघल यांची केवळ नऊ महिन्यात फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची सिडकोमध्ये बदली झाली. त्यानंतर बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी मार्च २०२४ मध्ये अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर डिग्गीकर यांच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली. या प्रकरणात तत्परतेने काम न केल्यामुळे १५ डिसेंबर २०२४ रोजी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांनतर काही दिवस महाव्यवस्थापक पद रिक्तच होते. त्यानंतर डॉ. हर्षदीप कांबळे यांची महाव्यवस्थापक पदावर नेमणूक झाली. मात्र, या बदलीबाबत नाराज असलेल्या कांबळे यांनी महाव्यवस्थापक पदाचा कार्यभारच स्वीकारला नव्हता. अखेर आता या पदाचा कारभार एस. व्ही. आर श्रीनिवास यांनी स्वीकारला आहे.

गेल्या तीन वर्षात महाव्यवस्थापक पदावर चार आयएएस अधिकारी येऊन गेले. मात्र, कुणाचाही कार्यकाळ पूर्ण झाला नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रमात ठोस नियम आणि धोरणांची अंमलबजावणीच झाली नाही. दरम्यान, महापालिकेच्या अर्थसंकल्पात आगामी वर्षात बेस्ट उपक्रमासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन महाव्यवस्थापक बेस्ट उपक्रमात काय बदल करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रीनिवास यांनी मेट्रो रेल्वे प्रकल्प, मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक, शहरी पाणीपुरवठा प्रकल्प बोगदे आणि उन्नत रस्ते, नगर नियोजन, मुंबई आणि इतर शहारांतील परवडणारी गृहसंकुले, गृहनिर्माण धोरण, धारावी पुनर्विकास प्रकल्प आदींमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.