महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र विदर्भाची भूमिका म्हणजे आईपासून मुलास तोडण्यासारखे आहे. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्याने अखंड महाराष्ट्राला तोडण्याची भाषा करावी म्हणजे महाराष्ट्राच्या रखवालदारानेच ‘घोटाळा’ करण्यासारखे आहे, अशी खोचक टीका करीत भाजपच्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेचा शिवसेनेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रातून समाचार घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका मांडणे हे अखंड महाराष्ट्राच्या केशरी दुधात मिठाचा खडा टाकण्यासारखे असल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे. विदर्भाचे मागासलेपण आहेच. ते दुरुस्त करण्याचे कर्तव्य पार पाडा. फडणवीस यांनी आता राज्याची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यामुळे त्यांना हे कर्तव्य पार पाडणे सहज शक्य आहे. त्यात कुचराई करू नका. कारण तसे झाले तर तो पेशंटचे ऑपरेशन करताना निष्णात डॉक्टरने ऐनवेळी शस्त्र टाकून ऑपरेशन थिएटरबाहेर जाण्यासारखा प्रकार ठरेल, अशी टीका शिवसेनेने फडणवीसांवर केली.
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील दौऱ्यादरम्यान योग्य वेळी विदर्भ वेगळा करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने संताप व्यक्त करत ‘सामना’तील अग्रलेखात भाजपवर आगपाखड केली आहे.