मुंबई : ऐन खरीप, रब्बी हंगामात दरवर्षी होणारी बनावट बियाणांची विक्री, बियाणे न उगविणे, निकृष्ट असणे. परराज्यांतून आणलेल्या निकृष्ट, बनावट बियाणांची खरेदी -विक्री टाळण्यासाठी आणि कृत्रिम तुटवडा भासवून चढ्या दराने होणाऱ्या विक्रीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने ‘साथी’ संकेतस्थळाची निर्मिती केली आली आहे. प्रमाणित बियाणांसाठी पूर्वीपासून कार्यान्वित असणारी ही व्यवस्था, आता सत्यप्रत बियाणांसाठीही सुरू करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या कृषी विभागाने या बाबतचा एक शासन आदेश शुक्रवारी प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने बियाणांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या संनियंत्रणासाठी साथी (सीड ऑथेंटिकेशन ट्रेसिबिलिटी अॅण्ड होलिस्टिक इन्व्हेंटरी, एसएटीएचआय) संकेतस्थळ विकसीत केले आहे. साथी संकेतस्थळाची अंमलबजावणी दोन टप्प्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पैदासकार, पायाभूत व प्रमाणित बिजोत्पादन आणि दुसऱ्या टप्प्यात उत्पादित बियाण्याचे वितरण आणि विक्रीची नोंदणी करण्यात आली आहे.
राज्यात खरीप हंगाम २०२३ पासून महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेमार्फत टप्पा एकची कार्यवाही सुरू आहे. यामध्ये बियाणे उत्पादक कंपन्यांच्या पैदासकार, पायाभूत व प्रमाणित बिजोत्पादन कार्यक्रमाची सर्व प्रक्रिया म्हणजे उत्पादक कंपन्यांचे शेत नोंदणीपासून उत्पादीत बियाण्याचा साठा प्रमाणपत्र देण्यापर्यंतची प्रक्रिया साथी संकेतस्थळावर केली जाते. कृषी विभागाच्या संनियंत्रण समितीने खरीप हंगाम २०२४ पासूनच उत्पादीत झालेल्या प्रमाणित बियाण्याचे वितरण, विक्री साथी संकेतस्थळाच्या माध्यमातून सुरू केली आहे.
केंद्र सरकारने रब्बी हंगाम २०२५ पासून सत्यप्रत (ट्रूथफूल लेबल्ड) बियाणे साथी संकेतस्थळावर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २३ मार्च रोजी झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यानुसार राज्यात यंदाच्या खरीप हंगामापासूनच सत्यप्रत बियाणे साथी संकेतस्थळावर कार्यान्वित करण्याचा निश्चित करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार, बियाणे उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कंपन्यांना बियाणांच्या किमान गुणवत्तेच्या निकषांची पूर्तता करावी लागेल. उगवण क्षमता टक्केवारी, शुद्धता, आद्रर्ता पातळी निश्चित मानांकानुसार ठेवावी लागेल. सत्यप्रत बियाणांना योग्य नामनिर्देश, क्युआर कोड करावा लागले. बियाणांचा साठा, होलसेल विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि शेतकऱ्यांना होणारी विक्री, ही सर्व प्रक्रिया साथी संकेतस्थळामार्फत करावी लागेल.
अनियमितता, गैरव्यवहाराला लगाम
सत्यप्रत बियाणे मुख्यता खासगी बियाणे उत्पादक संस्थामार्फत उत्पादित केलेले संशोधित वाणाचे बियाणे असते. शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या बियाणांमध्ये ७० ते ८० टक्के सहभाग सत्यप्रत बियाणांचा असतो. त्यामुळे बियाणे वितरण प्रणालीमध्ये शोधण्यायोग्यता (ट्रेसेबिलिटी) वाढण्यास मदत होईल. बियाणांचे उत्पादन, होलसेल विक्रेता, किरकोळ विक्रेता ते शेतकरी, अशा बियाणाच्या प्रवासावर नियंत्रण ठेवता येईल. त्यामुळे खरेदी – विक्रीतील पारदर्शकता वाढेल. बनावट, कालबाह्य आणि अनाधिकृत बियाण्यांच्या विक्रीवर प्रतिबंध घालून बियाणे व्यवसायातील अपप्रवृत्ती आणि गैरव्यवहारांना आळा घातला येईल. बियाणांची उपलब्धता, गरज, मागणी बियाणे उत्पादक कंपन्या, वितरक आणि विक्रेते यांच्यात समन्वय वाढवून बियाणांचे व्यवस्थापन करणे सोयीचे होणार आहे. परराज्यांतून येणाऱ्या बनावट बियाणांवर कारवाई करता येईल. निकृष्ट दर्जामुळे बियाणे न उगविल्यास शेकऱ्यांना मदत देण्यास किंवा बियाणे कंपनीवर कारवाई करणे सोयीचे होईल.
रब्बी हंगामापासून साथी पूर्ण क्षमतेने कार्यरत
कृषी आयुक्तालय बियाणांची विक्री साथी संकेतस्थळाच्या माध्यमातून करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय ठेवणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शक सूचना दिल्या जातील. शेतकऱ्यांमध्ये साथी संकेतस्थळाच्या माध्यमातून बियाणे खरेदीबाबत जागृती केली जाईल. साथी संकेतस्थळावरून घेतलेल्या बियाणांच्या बाबत काही तक्रारी असतील तर त्याचे निवारण करण्यासाठी मदत कक्षाची स्थापन केली जाणार आहे. सत्यप्रत बियाणांसाठी रब्बी हंगामापासून साथी संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल, अशी माहिती निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरकर यांनी दिली.