‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. दरम्यान, भेटीनंतर संभाजी भिडे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद सांधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याशी झालेल्या भेटीचे कारणही सांगितले.
या भेटीबाबात बोलताना ते म्हणाले, “मी राष्ट्रहिताच्या काही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, मंत्रीमंडळाची बैठक असल्याने सविस्तर चर्चा झाली नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांची पुन्हा भेट घेणार आहे”, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली. दरम्यान, या भेटीचे काही राजकीय अर्थ काढले जात असल्याबाबात विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
हेही वाचा – “चुलीत जाऊ द्या ती आमदारकी, डब्यात जाऊ द्या खासदारकी, कोण…”, नितेश राणे आक्रमक
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीही त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारचे कौतुक केले. “ते मुख्यमंत्री झाल्यापासून मला त्यांना भेटायचं होतं. मात्र, काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. त्यामुळे आज वेळ काढून मी त्यांना भेटायला आलो”, असे ते म्हणाले. तसेच सरकारच्या कामागिरीबाबत विचारले असता त्यांनी हे सरकार सरकार उत्तमरित्या काम करत असून महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.