आठवडय़ाची मुलाखत : सव्यसाची मुखर्जी
‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’चे महासंचालक
मुंबईस्थित ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’चे महासंचालक सव्यसाची मुखर्जी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग’तर्फे त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे. २००७ साली सूत्रे हाती घेतल्यानंतर संग्रहालयाला नवीन स्वरूप देण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. संग्रहालय लोकाभिमुख करण्याचे महत्त्वाचे योगदान त्यांच्या नावावर जमा असून त्या योगदानासाठी आणि त्यांनी त्या संदर्भात राबवलेल्या अभिनव कल्पनांसाठी त्यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेली ही विशेष मुलाखत.
* संग्रहालयांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात गेल्या २० वर्षांमध्ये खूप मोठा बदल जगभरात झाला आहे. आपण याकडे कसे पाहाता?
पूर्वी संग्रहालयांकडे केवळ भूतकाळातील रम्य आठवणींचा साठा किंवा दालन म्हणून पाहिले जात होते. कितीही वर्षांनी तुम्ही संग्रहालयाला भेट दिलीत तरी त्या त्या वस्तू त्या त्या जागीच आढळायच्या. मात्र आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. आता संग्रहालये सतत बदलती असतात. त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्येच मूलभूत फरक झाला आहे. संग्रहालयांच्या नव्या दृष्टिकोनानुसार, समाज आणि राष्ट्र या दोन्हींच्या प्रगतीमध्ये मोलाची भूमिका बजावणारी कायमस्वरूपी वास्तू म्हणजे संग्रहालये होत. या दृष्टिकोनामुळेच संग्रहालयांच्या कार्यपद्धतीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. ही कार्यपद्धतीही आता सतत बदलती असते. आता तुम्ही दर तीन महिन्यांनी संग्रहालयांना भेट दिलीत, तर तुम्हाला निश्चित रूपाने नवीन काही तरी पाहायला मिळेल.
* या नव्या दृष्टिकोनामुळे कार्यपद्धतीत नेमका कोणता फरक पडला आहे?
आजवर आपण केवळ वस्तू आणि वास्तू यांच्याकडे पारंपरिक वारसा (हेरिटेज) म्हणून पाहत होतो. मात्र आता त्याही दृष्टिकोनात फरक पडला असून या वस्तू आणि वारसा (टँजिबल हेरिटेज) सोबत गद्य-पद्य मौखिक परंपरा, नृत्य आदींकडेही आता अमूर्त वारसा (इन्टॅन्जिबल हेरिटेज) म्हणून पाहिले जाते आणि त्यांचेही दस्तावेजीकरण करून जपणूक केली जाते, कारण हे सारे मिळून मानवतेचा पारंपरिक वारसा तयार होत असतो.
* पूर्वी केवळ वारसा वस्तू गोळा करणे आणि मांडणे एवढाच हेतू असलेल्या संग्रहालयांमध्ये नवा बदल कोणता झाला आहे?
पूर्वी संग्रहालये जुन्या किंवा वारसा लाभलेल्या वस्तू गोळा करून रम्य किंवा समृद्ध भूतकाळ जपत. आतादेखील हे काम सुरूच आहे, पण केवळ स्मृती जतन करणे हे संग्रहालयांचे काम नाही, तर जपलेले सारे लोकांपर्यंत पोहोचवणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे, हे आता भारतातील संग्रहालयांनाही प्रकर्षांने लक्षात आले आहे. म्हणूनच त्यांच्या दृष्टिकोनात आणि कार्यपद्धतीत खूप मोठा बदल झालेला दिसतो. संग्रहालयांमध्ये कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने मांडायच्या याचेही एक शास्त्र आता चांगल्या पद्धतीने विकसित झाले आहे. संग्रहालये आता त्याचाही चांगला वापर करतात. शिवाय अभ्यास, संशोधन यासाठी तरुणांना उद्युक्त करतात. या वस्तू आणि वास्तू किंवा अमूर्त वारसा यामध्ये असलेले ज्ञान-परंपरा या नव्या पिढीपर्यंत पोहोचणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत जाणे व त्यांना संग्रहालयांमध्ये सतत यावेसे वाटणे यावर आता सर्वाधिक भर दिला जातो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला लाभलेल्या लोकप्रियतेमागे हेच महत्त्वाचे गमक आहे. आम्ही आता संग्रहालयाला तरुण पिढीशी जोडले आहे. त्यामुळे पूर्वी जिथे केवळ पांढरे केस असलेल्या व्यक्तीच अधिक दिसायच्या तिथे आता तरुणाईचा वावर वाढलेला दिसतो. हा सर्वात महत्त्वाचा बदल आहे, कारण ही तीच पिढी आहे, ज्यांच्या दृष्टिकोनात फरक पडला, त्यांना त्यांच्या परंपरा आणि पारंपरिक वारशाचा अभिमान वाटला तर त्यांच्या कृतीमध्ये चांगला फरक पडणार आहे, ज्याचा देशाला नक्कीच फायदा होईल.
* मोबाइलमग्न असलेल्या तरुण पिढीला कोणत्याही गोष्टीकडे वळवणे तेवढे सोपे नाही, असे अलीकडे म्हटले जाते. मग हे कसे काय साध्य केलेत?
तरुणांना सातत्याने बदल हवा असतो आणि अनेक कृती कार्यक्रम हवे असतात, ही बाब आम्ही लक्षात घेतली आणि म्युझियममध्ये अनोख्या अभिनव संकल्पनांचा वापर सुरू केला. सध्या म्युझियममध्ये पारंपरिक कारागीर कार्यशाळा सुरू आहे. देशातील प्रख्यात कलावंत संग्रहालयात आले असून त्यांच्याचकडून त्यांची कला शिकण्याची संधी यानिमित्ताने जनतेला मिळते आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत तुम्ही पाहिलेत तर संग्रहालयाचे सर्व कार्यक्रम गर्दीने ओसंडून वाहत असतात. आम्हाला कार्यक्रमाला गर्दी होत नाही, अशी तक्रार ऐकूच येत नाही. तज्ज्ञांची व्याख्यानेही आता गेली काही वर्षे दर महिन्याला एक याप्रमाणे नियमित होत असून ती विनामूल्य असतात. तिथेही तरुणांची गर्दी लक्षणीय असते. आता तर गेल्या काही काळात आम्ही सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. तेही लोकांपर्यंत पोहोचण्याचे आणि ज्ञान पोहोचवण्याचे एक प्रभावी आधुनिक माध्यम आहेच.
* संग्रहालयानेही गेल्या आठ-नऊ वर्षांमध्ये स्वत:मध्ये खूप बदल केले आहेत.
होय, हे बदल त्या बदललेल्या दृष्टिकोनाचेच परिपाक आहेत. हे संग्रहालय मुंबईमध्ये आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने देशभरातून मंडळी इथे येतात हे लक्षात घेतले पाहिजे. हे लक्षात घेऊनच आम्ही काही नवीन दालनांची रचना केली. त्यात वस्त्रोद्योग दालनाचा समावेश होतो. यानिमित्ताने प्राचीन ते अर्वाचीन वस्त्रोद्योगाचा आढावा घेतानाच सर्व देशवासीयांशी हे दालन जोडले गेले आहे, कारण प्रत्येक राज्यातील वस्त्रोद्योग परंपरांचा यात समावेश आहे. त्यामुळे कोणीही मुंबईकर जो बाहेरून येऊन इथे स्थायिक झालेला आहे, त्याला त्याच्या भागाचा अभिमान वाटावा, अशी प्रत्येक गोष्ट इथे आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यांतून मुंबईत येणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. हे लक्षात घेऊन हिमालयीन कलेच्या संदर्भातील दालनाची निर्मिती करण्यात आली. अशा प्रकारचे हे देशभरातील एकमेव अनोखे दालन ठरले आहे.
* तरुणांशी आणि एकूणच समाजातील विविध घटकांशी जोडले जाण्यासाठी आणखी कोणते उपक्रम राबविण्यात आले?
आमचे संग्रहालय दक्षिण मुंबईमध्ये त्यामुळे उपनगराशी कसे जोडले जाईल, असा विचार मनात आला होता. शिवाय ते संपूर्ण महाराष्ट्राशीही जोडण्याचा विचार होता. त्यासाठी एक विचार पुढे आला. त्याला टाटा ट्रस्टने मदत केली आणि म्युझियम ऑन व्हील्स साकारले. तुम्हाला इथे यायला जमले नसेल तर म्युझियम तुमच्या दारी येईल, अशी ही कल्पना आहे. आम्ही शेजारच्या ठाणे जिल्ह्य़ात शिवाय महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांमध्येही गेलो. स्थानिकांच्या उदंड प्रतिसादाने आम्ही भारावलेले आहोत. आता खऱ्या अर्थाने हे लोकांचे संग्रहालय आहे, असे आम्हाला म्हणता येईल.
तरुणांशी जोडले जाण्यासाठी आम्ही ७०-८० महाविद्यालयांशी हातमिळवणी केली आहे. त्यांच्या उपक्रमांमध्ये आम्ही सहभागी असतो आणि आमच्या उपक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. शिवाय दुर्गम भागातील मुलांना इथे येणे जमत नाही, परवडत नाही. त्यासाठी सुमारे शंभरेक स्वयंसेवी संस्थांना आम्ही आवाहन करून आमच्याशी जोडून घेतले आणि त्यांच्या मदतीने खेडय़ापाडय़ांपर्यंत संग्रहालय पोहोचेल याची काळजी घेत आहोत.
* मानद डॉक्टरेट हे संग्रहालय मोठय़ा प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेल्या कष्टाचेच चीज आहे, असे वाटते का?
होय, हा सन्मान मी कृतज्ञतेने स्वीकारतो आहे. संग्रहालयांशी संबंधित कला व संस्कृतीच्या जपणुकीचा हा सन्मान आहे, असे मी मानतो आणि समस्त भारतीयांच्या वतीने त्याचा स्वीकार करतो आहे.
– विनायक परब
Vinayak.parab@expressindia.com
Twitter- @vinayakparab