राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदी  सचिन अहिर यांची नियुक्ती करण्यात आली.  तर  उपाध्यक्षपदी नवाब मलिक यांची निवड करण्यात आली आहे.  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी यासंदर्भातील घोषणा केली.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदासाठी सचिन अहिर, किरण पावसकर, नवाब मलिक, संजय दीना पाटील अशी नावे चर्चेत होती.  त्यापैकी सचिन अहिर यांची वर्णी अध्यक्षपदी लागली आहे. यापूर्वी आघाडी सरकारच्या कार्यकाळात त्यांच्याकडे गृहनिर्माण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. तसेच दहीहंडीसारख्या सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून अहिर यांचा मुंबई भागात मोठ्याप्रमाणावर जनसंपर्क आहे. मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय मिल मजदूर संघात अहिर यांनी काम केले आहे. तसेच इंटक कामगार युनियनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. त्यामुळेच आगामी निवडणूक व मुंबईतील भाजप-शिवसेना अंतर्गत वाद लक्षात घेता ही निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया भक्कम करण्याच्यादृष्टीने अहिर यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडूनच या नावाला दुजोरा मिळाल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader