मुंबईकरांचा आवडता दहीहंडी उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दहीहंडीची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. एकीकडे गोविंदा पथकं दहीहंडीचा सराव करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला वेगवेगळे राजकीय पक्ष दहीहंडीच्या मैदानात उतरले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहीहंडीला राजकीय रंग चढू लागले आहेत. भारतीय जनता पार्टीने मुंबईमधील वरळीतल्या जांबोरी मैदानात परिवर्तनाची दहीहंडी आयोजित केली आहे. भाजपाने गेल्या वर्षीसुद्धा या हंडीचं आयोजन केलं होतं. खरंतर शिवसेना आणि मनसे हे पक्ष आणि त्यांचे नेते मुंबईत मोठमोठ्या हंड्यांचं आयोजन करतात. परंतु, गेल्या वर्षीपासून भाजपा नेतेही दहीहंडीच्या मैदानात मोठ्या तयारीनिशी उतरत आहेत. त्यामुळे दहीहंडीचा उत्सव भाजपाने हायजॅक केला असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
सचिन अहिर म्हणाले, आम्ही दहीहंडीचा संकल्प केला होता, हे (भाजपा) परिवर्तन करायला निघाले आहेत. आम्ही संकल्पाची हंडी लावली. मला नाही वाटत की हे लोक आमच्या हंडीशी बरोबरी करू शकतील. तरीसुद्धा त्यांना आमच्या शुभेच्छा. दहीहंडीचं राजकीय हेतूने आयोजन केलं जात आहे, हे दुर्दैवी आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, त्यांनी (भाजपा) शपथपत्रावर लिहून द्यावं की, पुढची पाच ते १० वर्ष आम्ही अशा दहीहंडीचं नियोजन करू. निवडणुका आल्या की अशा हंड्यांचं आयोजन करायचं, अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करायचं आणि पुढची दोन-तीन वर्ष कुठंच दिसायचं नाही.
सचिन अहिर हे एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी अहिर म्हणाले, “याआधी भारतीय जनता पार्टीने वरळी नाक्याला अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले, ते कुठे गेले? हे कार्यक्रम आयोजित करणं बंद का झालं? असा प्रश्न निर्माण होत आहे.” यावर अहिर यांना विचारण्यात आलं की, वरळीकरांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत का? त्यावर सचिन अहिर म्हणाले, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी यांची घागर उताणीच राहणार आहे. कारण, असे कितीही कार्यक्रम आयोजित केले तरी त्यांना लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही.
आमदार सचिन अहिर म्हणाले, वरळी मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. कोळी समाजाला आपल्या बाजूने वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या कार्यक्रमाला किती खुर्च्या रिकाम्या होत्या, हे मी सांगायची करज नाही. लोकांना आपल्याकडे वळवून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. दहीहंडीच्या माध्यमातून हा राजकीय प्रयत्न सुरू आहे आणि हे दुर्दैवी आहे.