वैज्ञानिक प्रगती आणि काळाबरोबर शस्त्रास्त्रांमध्ये प्रामुख्याने तीन अक्षांवर किंवा बाबतीत सुधारणा होत गेली – पल्ला (रेंज), अचूकता (अॅक्युरसी) आणि संहारक क्षमता (लिथॅलिटी). अश्मयुगात काही फुटांवर दगड फेकून मारणारा माणूस आता हजारो किलोमीटर अंतरापर्यंत आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागू शकतो. हिटलरच्या जर्मनीने ‘व्ही-१’ व ‘व्ही-२’ ही जगातील पहिली क्षेपणास्त्रे बनवली आणि दुसऱ्या महायुद्धात त्यांचा सर्वप्रथम वापर केला. त्यातील ‘व्ही-१ फ्लाइंग बॉम्ब’चा नेम १७ किलोमीटरने चुकत असे. तर आताच्या अत्याधुनिक ‘टॉमहॉक’ क्रूझ क्षेपणास्त्राचा पल्ला १५०० ते २००० किमी आहे आणि त्यात त्याची नेम चुकण्याची शक्यता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी – सीईपी) केवळ २० ते ३० फूट इतकी आहे. आधुनिक लेझर गायडेड बॉम्बची अचूकता टाचणीच्या टोकाइतकी आहे. तलवार, भाला, बाण, बंदूक आदी शस्त्रांनी एका वेळी एक माणूस मारता यायचा. आजच्या अण्वस्त्रांमध्ये पृथ्वीचा अनेक वेळा संपूर्ण विनाश करण्याची क्षमता आहे.
शस्त्रांच्या विकासक्रमाचा हा आढावा रंजकच नव्हे तर उद्बोधकही आहे. काही शस्त्रे एखाद्या समुदायाशी निगडित आहेत आणि त्यांनी त्या समाजाचे नाव सर्वतोमुखी केले आहे. भारतात शीख धर्मीयांना कृपाण आणि कर्नाटकमधील कुर्ग येथील समाजाला बंदूक बाळगण्यास कायद्याने परवानगी आहे. कुकरीच्या वापरात पारंगत नेपाळच्या गोरखा योद्धय़ांनी जगभरच्या सेनानींकडून सन्मान मिळवला आहे. किंबहुना गोरखा आणि कुकरी तसेच जपानचे सामुराई लढवय्ये आणि त्यांच्या कटाना तलवारी यांच्यातील द्वैत संपून अद्वैत निर्माण झाले आहे. जेम्स बॉण्डच्या बंदुकांनीही रसिकांवर कायम अधिराज्य गाजवले आहे.
त्याप्रमाणे काही शस्त्रे आणि युद्धे यांचा संबंध कायमचा लक्षात राहिला आहे. दुसरे महायुद्ध आणि हिटलरचे ‘पँझर’ रणगाडे आणि ‘यू-बोट्स’, कोरियन युद्धात अमेरिकी ‘एफ-८६ सेबर’ आणि सोव्हिएत युनियनची ‘मिग-१५’ या विमानांच्या लढती (डॉगफाइट्स), व्हिएतनामच्या आकाशातील ‘एफ-४ फँटम’ आणि ‘मिग-२१’ यांच्या लढती, १९९१ चे आखाती युद्ध आणि ‘टॉमहॉक’ क्रूझ क्षेपणास्त्रे अशी काही समीकरणे आता दृढ बनली आहेत. ‘एके-४७’ सारखी काही शस्त्रे आख्यायिका बनली आहेत. जगातील प्रत्येक पाच बंदुकांपैकी एक ‘एके-४७’ आहे. इतका तिचा प्रसार आहे. जगभरच्या सेनादलांबरोबरच दहशतवाद्यांच्याही गळ्यातील ती ताईत बनली आहे. मोझांबिकच्या राष्ट्रध्वजावर ‘एके-४७’ला स्थान आहे आणि कलाशनिकोव्ह नावाचा व्होडकाही आहे. ही केवळ बंदूक न राहता तो एक ‘कल्ट’ बनला आहे.
शस्त्रांच्या या अमर्याद प्रसाराने अनेक समस्याही उभ्या केल्या आहेत. पाकिस्तान-अफगाणिस्तान, इराक-सीरिया यांसारख्या देशांतील ‘गन-कल्चर’ने तेथील पिढीच्या पिढी बरबाद केली आहे. आज अण्वस्त्रे, रायायनिक आणि जैविक अस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडून महाभयंकर संहार घडण्याचीही भीती आहे.
‘अश्व: शस्त्रं शास्त्रं वीणा वाणी नरश्च नारी च पुरुषविशेषं प्राप्य भवन्ति योग्यायोग्याश्च’ मात्र घोडा, शस्त्र, शास्त्र, वीणा, वाणी, नर, नारी यांची योग्यायोग्यता त्यांचा वापर कोण करते यावर अवलंबून असते, असे संस्कृत वचन आहे. हा विवेक बाळगणे आपल्याच हाती आहे.
sachin.diwan@expressindia.com