तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुंबईत येऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भाजपाविरोधी आघाडीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, केसीआर यांच्या काँग्रेसविरोधी भूमिकांमुळे ही आघाडी काँग्रेसला वगळून होणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी सूचक ट्वीट करत काँग्रेसला वगळून आघाडी करण्याची चर्चा करणाऱ्यांना इशारा दिलाय.

सचिन सावंत म्हणाले, “जंगलातील कितीही छोटे छोटे प्राणी एकत्र आले तरी त्यांना “सिम्बा” शिवाय ‘स्कार’चा पराभव करता येणे अशक्य आहे.”

“काँग्रेसशिवाय बिगर भाजप पक्षांची आघाडी यशस्वी होऊ शकत नाही”

काँग्रेसशिवाय भाजपविरोधी आघाडी आकाराला येऊ शकत नाही वा यशस्वी होऊ शकत नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. चंद्रशेखर राव यांनी संसदेत भाजपला मदत होईल अशीच भूमिका आतापर्यंत घेतली होती. आता त्यांचे विचार बदलले आहेत. त्यांच्या भाजपच्या विरोधात बदललेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. पण काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांचा भाजपला सक्षम पर्याय होऊ शकत नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेसला बाहेर ठेवून तिसरी आघाडीवर केसीआर यांची भूमिका काय?

के. चंद्रशेखर राव म्हणाले, “आज आमच्या दोघांच्या चर्चेने एक सुरुवात झालीय. आम्ही स्पष्ट सांगितलंय की यात कोणतीही भविष्यवाणी करण्याची गरज नाही. आम्ही देशाच्या इतर नेत्यांशी चर्चा करू आणि जो निर्णय होईल तो देशासमोर ठेऊ.”

काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी? संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत यांनी, “आम्ही कधीच काँग्रेसला वगळून आघाडी करण्याचा उल्लेख केलेला नाही. ज्यावेळी ममता बॅनर्जींनी अशा राजकीय आघाडीबद्दल विषय काढला तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता ज्याने काँग्रेसला सोबत घेण्याची मागणी केली. केसीआर यांच्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता आहे,” असं मत व्यक्त केलंय.

पवार यांच्याकडून थंड प्रतिसाद…

देशाच्या राजकारणातील बुजूर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राव यांच्या राजकीय खेळीला अजिबात महत्त्व दिले नाही. चंद्रशेखर राव यांचे भाजपबरोबर बिनसल्यापासून त्यांनी भाजपच्या विरोधात आघाडी उभारली आहे. ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच विरोधी आघाडीचे नेतृत्व आपल्याकडे असावे, अशी चंद्रशेखर राव यांची इच्छा दिसते. मुंबई भेटीत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांचा सूर तसाच होता.

हेही वाचा : विश्लेषण : तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व चंद्रशेखर राव करणार का?

सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पण चंद्रशेखर राव यांच्या समक्षच शरद पवार यांनी त्यांना थंडा प्रतिसाद दिला. चंद्रशेखर राव यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत तेलंगणातील विकास मुद्दय़ांवर चर्चा झाली. फक्त विकास, विकास आणि विकास यावर चर्चा झाली. भेटीत राजकीय चर्चा फारशी झाली नाही, असे सांगत पवार यांनी  राव यांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याच्या प्रयत्नांना फारसे महत्त्व देत नाही हेच अधोरेखित केले.