काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यावरून बराच वाद झाला होता. दरम्यान, आता राज्यपालांनी २६/११ हल्यातील हुताम्यांना अभिवादन करताना पात्रदाणे न काढल्याचा आरोप करत काँग्रेसने पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधला आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच त्यांनी राज्यपालांचा व्हिडिओदेखील ट्वीट केला आहे.
हेही वाचा – “त्यांना हे सांगावं लागतं, यातच सगळं आलं”, उदय सामंतांच्या ‘त्या’ विधानावर ठाकरे गटाकडून सूचक विधान!
काय म्हणाले सचिन सावंत?
”अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत आहेत”, अशी प्रतिक्रिया सचिन सावंत यांनी दिली आहे. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यापालांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचा राडा, घोषणाबाजी करत अंगावर शाईफेक
शिवरायांबाबत केलेल्या विधानावरून झाला वाद
काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. “आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असे ते म्हणाले होते