मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकीर्दीतील अखेरचा सामना बघण्यासाठी त्याची आई येणार असल्याने तिला वानखेडे मैदानावरील अध्यक्षीय दालनापर्यंत जाण्यासाठी कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी सचिन स्वतः लक्ष घालून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱयांसोबत नियोजन करीत आहे.
वानखेडे मैदानावरील अध्यक्षीय दालनापर्यंत जाण्यासाठी असलेली लिफ्ट अरूंद असल्यामुळे सचिनची आई रजनी या व्हिलचेअरमध्ये बसून त्याचा वापर करू शकणार नाहीत. त्यामुळे एमसीएने मैदानावर व्हिलचेअर जाऊ शकेल, असा सरकता जिना (रॅम्प) लावण्याचा निर्णय़ घेतला. या रॅम्पच्या नमुन्याची पाहणी खुद्द सचिन तेंडुलकरने सोमवारी वानखेडेवर केली. रणजी संघाच्या सरावासाठी सचिन सोमवारी वानखेडेवर आला होता. त्यावेळी त्याने एमसीएच्या पदाधिकाऱयांसोबत या रॅम्पबद्दल बराचवेळ चर्चा केली. रजनी या सामना बघण्यासाठी आल्यावर त्यांना अध्यक्षीय दालनापर्यंत जाण्यासाठी कोणताही त्रास होऊ नये, यादृष्टीने सचिन नियोजन करीत आहे.
वेस्ट इंडिज संघाविरुद्ध १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान हा सामना होणार आहे. रजनी यांना हा सामना बघता यावा, यासाठी तो वानखेडेवर घेण्याची विनंती सचिनने एमसीएकडे केली होती. ती एमसीएने मंजूर केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा