माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी त्यांच्या मुंबईतील बंगल्यामध्ये अतिरिक्त बांधकाम करण्यासाठी सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे परवानगी मागितली होती. आज सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने त्यांना अटी आणि शर्थींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे दोघांनाही आता आपापल्या बंगल्यात नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे.
हेही वाचा – Video : सचिन तेंडुलकरने आईबरोबरचा आंबा खातानाचा व्हिडीओ केला शेअर, चाहते म्हणाले…
मुंबईच्या पेरी क्रॉस रोड येथील कार्टर रोड परिसरातील समुद्रकिनाराऱ्याला लागून सचिन तेंडुलकर यांचा बंगला आहे. सध्याच्या बांधकामानुसार, या बंगल्यात लोवर बेसमेंट, अप्पर बेसमेंट, तळमजला आणि तीन मजले आहेत. या बंगल्याच्या बांधकामाला २०११ साली एक फ्लोअर स्पेस इंडेक्स (FSI) नुसार परवानगी देण्यात आली होता. त्यानंतर ती वाढवण्यात आली. मात्र, काही दिवसांपूर्वीच तेंडुलकर यांनी या बंगल्यात अतिरिक्त बांधकामाच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. या अर्जाद्वारे त्यांनी पाचवा मजला बांधण्याची परवानगी मागितली होती. हा अर्ज सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांना आता अतिरिक्त बांधकाम करता येणार आहे.
सचिन तेंडुलकर यांच्याबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनीही त्यांच्या ‘जलसा’ बंगल्यात नव्याने बांधकाम करण्याची परवानगी मागितली होती. त्यांनाही सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या ‘जलसा’ बंगल्यातील सध्याच्या बांधकामानुसार, बेसमेंट, तळमजला आणि आणखी दोन मजले आहेत. मात्र, दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम अपूर्ण आहे. हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तसेच आणखी एक मजला बांधण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे.