राज्यात घडत असलेल्या घडामोडींवर भाजपाच्या राज्यातल्या आणि केंद्रातल्या नेत्यांनी देखील महाराष्ट्र सरकारवर एकापाठोपाठ आरोप करायला सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यापाठोपाठ केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील करोना लसीकरण मोहीम आणि सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली. आता राज्य सरकारमधील जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सगळ्या टीकेनंतर भाजपावर निशाणा साधला आहे. “गोबेल्सचं सूत्र होतं, सतत तेच तेच खोटं बोलत राहायचं, म्हणजे लोकांना ते खरं वाटतं. भाजपाकडून वारंवार त्याच नीतीचा अवलंब केला जातोय. पण सत्य सगळ्यांसमोर येईलच”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.

“भाजपा नेते बोलतात, मग NIA माहिती देतं”

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी एनआयएच्या तपासावरून भाजपावर निशाणा साधला. “असं लक्षात येतंय, की भाजपाचे नेते बोलतात आणि त्यानंतर एनआयएकडून माहिती बाहेर येते. तपास चालू आहे की राजकारण चालू आहे, याचा अभ्यास करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्याच्या मागे सरकार कधी जाईल, याची वाट पाहणाऱ्या लोकांच्या शक्ती आहेत याबाबत राज्यातल्या जनतेची खात्री व्हायला लागली आहे. भाजपाच्या काही नेत्यांनी अजून एक विकेट पडणार आहे अशा आशयाचं भाष्य करणं, नंतर एनआयएकडे गेलेलं पत्र प्रसारमाध्यमांना मिळणं आणि त्यात अजून एक-दोन नावं येणं. या सगळ्यावर अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. इतर नावांमध्ये तथ्य आहे की नाही हे समोर येईलच”, असं जयंत पाटील म्हणाले.

“महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहेत”, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा राज्य सरकारवर निशाणा!

मूळ तपासावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न?

दरम्यान, भाजपाकडून सचिन वाझे प्रकरणात मूळ तपासावरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. “मूळ तपासावरून लोकांचं लक्ष विचलित करून नको त्या चर्चा घडवून आणणं हा प्रकार गेल्या काही काळापासून देशात सुरू आहे. त्यामुळे गाडी कुणी ठेवली त्यांना अटक का नाही झाली? वाझेचा म्होरक्या कोण आहे? आमच्यावर कुणीतरी आरोप केला म्हणून कुणाला संरक्षण मिळतंय का? हेही जनतेला लक्षात यायला लागलं आहे. भाजपाने आमच्याविरोधी सरकारच्या सेवेत असणाऱ्या पण पदापासून बाजूला झालेल्या व्यक्तीने आरोप केले आहेत. ते पदावर असते, तर त्यांनी कदाचित हा आरोप केलाही नसता”, असं पाटील म्हणाले.

“कितीही हाकाटी पिटली, तरी वस्तुस्थिती लोकांच्या लक्षात कधी ना कधी येतेच. अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवली. ज्याची गाडी होती त्याची हत्या झाली. हे सगळं बाजूला राहिलं आणि ज्याच्यावर हे आरोप आहेत तो काय म्हणतोय त्याच्याच बातम्या जास्त यायला लागल्या. खुनाचा आरोप असणाऱ्या माणसाच्या भाष्यावर समाज कसा विश्वास ठेवेल”, असंही पाटील यांनी यावेळी नमूद केलं.

महाराष्ट्रावर अन्याय का? आकडेवारी देत राजेश टोपेंनी केला मोदी सरकारवर गंभीर आरोप!