मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी आणि अँटेलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी सचिन वाझे याने मांजरीचं पिल्लू दत्तक घेण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. सचिन वाझे हा सध्या तुरुंगात आहे, त्याला ज्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे तिथे एक मांजरीचं पिल्लू आहे. हे मांजरीचं पिल्लू आजारी पडल्याने सचिन वाझेने ते दत्तक घेण्यासाठी अर्ज केला आहे. सचिन वाझेच्या अर्जानंतर न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सचिव वाझेवर काय आरोप आहेत?
प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाच्या बाहेर कारमध्ये स्फोटकं ठेवल्याचा आरोप सचिन वाझेवर आहे. तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि त्या प्रकरणातले पुरावे नष्ट करणं हे आरोपही आहेत. सचिन वाझेला नवी मुंबईतल्या तळोजा येथील कारागृहात ठेवण्यात आलं आहे. सचिन वाझे एनआयए कोठडीत आहे. तो ज्या तळोजा तुरुंगातल्या कोठडीत राहतो तिथे एक मांजरीचं पिल्लू आजारी झालं आहे. हे पिल्लू दत्तक घेण्याचा अर्ज सचिन वाझेने कोर्टाकडे केला आहे.
सचिन वाझेने अर्जात काय म्हटलं आहे?
सचिन वाझेने त्याच्या अर्जात म्हटलं आहे की त्याच्या कोठडीत येणारे मांजरीचे पिल्लू दत्तक घ्यायचे आहे. या पिल्लाला आपण झुमका हे नाव दिलं आहे. हे पिल्लू आजारी आहे त्यामुळे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणूनच हे मांजरीचे पिल्लू दत्तक घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागणारा दोन पानांचा हस्तलिखित अर्ज सचिन वाझेने सादर केला आहे. न्यायालयाने याबाबत तुरुंग प्रशासनाला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे. गुरुवारी सचिन वाझे याला अँटेलिया प्रकरणी खटल्याच्या सुनावणीच्या वेळी विशेष एनआयए न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याने अर्जाद्वारे ही मागणी केली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.