Sada Sarvankar vs Amit Thackeray: माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे) आणि मनसे अशी तिरंगी लढत होत आहे. मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे. तसे तसे प्रचार रंगतदार होत चालला आहे. अमित ठाकरे हे सहकुटुंब घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देत आहेत. तर सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर यादेखील प्रचारात हिरीरीने उतरल्या आहेत. प्रिया सरवणकर यांनी नुकतीच एका जाहीर सभेतून अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या भाषणात प्रिया सरवणकर यांनी अमित ठाकरेंसह, आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत, माजी महपौर किशोरी पेडणेकर आणि मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर जोरदार टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> “उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या सांगण्यावरुन लक्ष्मीकांत पाटील..”, परमबीर सिंग जस्टिस चांदिवाल यांच्या दाव्यावर काय म्हणाले?

राजपुत्राला जनता स्वीकारत नाही

प्रिया सरवणकर म्हणाल्या, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवीन चेहरा राजकारणात उतरवला, असे सांगितले जाते. ते जर या उमेदवाराला ते फ्रेश चेहरा म्हणत असतील तर हा फ्रेश चेहरा चित्रपटांसाठी ठीक आहे. पण त्याचे राजकारणात काय काम? ते ज्या गल्लीत प्रचाराला जातात, तिथले पाच प्रश्नही त्यांना सांगता येत नाहीत. असा नवीन चेहरा कुणाला हवाय? मनसेने त्यांना प्रमोट करताना नवीन चेहरा असल्याचे म्हटले. नेता म्हटले तर त्याला कर्तुत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व हवे. माझा प्रश्न आहे, फक्त आडनाव असणे, हे कर्तुत्व असू शकते का?

वरळीच्या युवराजाला जनता कंटाळली

फक्त हातवारे केले म्हणजे आमदार नाही होता येत. एक युवराज वरळीकरांनी निवडून दिला. त्या युवराजाला निवडून देऊन तेथील जनता पश्चाताप व्यक्त करत आहे. एका युवराजाला मत देऊन जर मतदार पाच वर्ष पश्चाताप व्यक्त करत असतील तर या ‘राज’पुत्राला तुम्ही मतदान करणार का? असा सवाल प्रिया सरवणकर यांनी उपस्थित केला. लोकांना ‘राज’पुत्र नको आहे, तर त्यांची सेवा करणारा सेवक हवा आहे.

मनसेचा पळपुटा पदाधिकारी ज्याला नगरसेवक पदावरही विजय मिळविता आला नाही, तो आज आम्हाला शिकवत आहे. पक्षाने मागच्या वेळी त्याला माहीम विधानसभेसाठी उमेदवारी दिली होती. यावेळी त्याला वरळीत धाडले. या ‘पांडे’ला नगरसेवक, आमदार म्हणून जिंकून येता येत नाही. तो आमच्या बद्दल बोलतो.

प्रिया सरवणकर यांनी फक्त अमित ठाकरेच नाही तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांच्यावर टीकास्र सोडले. हे महाशय नगरसेवक पदावर एकदा काँग्रेस आणि अपक्ष म्हणून लढताना पडले. प्रत्येक निवडणुकीला या माणसाने कुणाच्या तरी विरोधात निवडणूक लढवली आणि काहीतरी घेऊन माघार घेतली. असा माणूस प्रामाणिक तरी कसा म्हणायचा? अशी टीका प्रिया सरवणकर यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sada sarvankar daughter priya sarvankar criticized aaditya and amit thackeray on mahim vidhansabha constituency kvg