Sada Sarvankar : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या दुसऱ्याच यादीत त्यांचा मुलगा अमित ठाकरेंना उमेदवारी दिली. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असं वाटलं होतं. पण तसं घडलं नाही. कारण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आणि उद्धव ठाकरेंनीही उमेदवार दिला. माहीममध्ये त्यामुळे तिरंगी लढत असणार आहे. तरीही राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना निवडून आणणारच असा निर्धार केला. याबाबत सदा सरवणकर ( Sada Sarvankar ) यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. राज ठाकरेंच्या मनात काय ते आपल्याला कळलं नाही असं सरवणकर ( Sada Sarvankar ) म्हणाले आहेत.
४ नोव्हेंबरच्या आधी काय घडलं?
अमित ठाकरे यांचं नाव जाहीर झालं असल्याने त्यांनी माहीममधून अर्ज दाखल केला होता. त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या सदा सरवणकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला. ४ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घ्यायचे होते. मात्र सदा सरवणकर यांनी आपण माहीममधून उमेदवारी अर्ज भरणारच अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र सदा सरवणकर ( Sada Sarvankar ) यांनी अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवली नाही.
हे पण वाचा- राज ठाकरे यांनी सरवणकर यांना भेट नाकारली
४ नोव्हेंबरला काय घडलं?
४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची १५ ते २० मिनिटं उरली असताना सदा सरणवकर यांनी त्यांच्या मुलाला राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी पाठवलं. मात्र राज ठाकरेंनी तुम्हाला काय हवं ते करा असं सांगितलं आणि भेट नाकारली. त्यानंतर उमेदवारी अर्ज हा सदा सरवणकर यांनी मागे घेतला नाही. माहीमच्या जागेवरुन अशा नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर माहीममध्ये राज ठाकरेंनी सभा १० नोव्हेंबरला पार पडली. या सभेत माहीममधून अमित ठाकरेंना निवडून आणणारच असा निर्धार त्यांनी केला. तसंच सदा सरवणकर ( Sada Sarvankar ) यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आता सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंच्या मनात काय? ते कळलं नाही असं म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या मनात काय ते मला कळलंच नाही-सरवणकर
राज ठाकरे आणि माझी थेट चर्चा झाली नाही. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असेल. मला एकनाथ शिंदेंनी सांगितलं की राज ठाकरेंना जाऊन भेटा आणि ते सांगतील तसं वागा, मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारली. काय त्यांच्या मनात होतं ते काही समजलं नाही. त्यांनी सांगितलं की ज्यांना उभं राहायचं असेल त्यांनी उभं राहा. असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.
शिवाजी पार्क मैदानावर राजकीय पक्षाच्या किती सभा व्हाव्यात मेरिटवर ही संमती दिली जाते. तिथे काही पक्षीय राजकारण नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनी आम्ही तिथे जाऊन अभिवादन करतो. आमच्यासाठी ते स्फूर्ती स्थळ आहे असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.