विशिष्ट प्रकारची संवादशैली आणि कसदार अभिनयाच्या जोरावर गेली तीन दशके हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे रविवारी मध्यरात्री मुंबईत खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. अमरापूरकर यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला कलाकार हरपला असल्याची भावना मराठी आणि हिंदूी चित्रपटसृष्टीत व्यक्त करण्यात येत आहे.
फुफ्फुसांना जंतुसंसर्ग झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना कृत्रीम श्वसनयंत्रणेवर ठेवून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते मात्र त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर रविवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले. मराठी रंगभूमीवर अमरापूरकर यांचे ‘हॅण्ड्सअप’हे नाटक गाजले होते. या नाटकातील त्यांची भूमिका पाहून गोविंद निहलानी यांनी त्यांची ‘अर्धसत्य’ चित्रपटातील भूमिकेसाठी निवड केली. या चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली आणि अमरापूरकर यांची बॉलिवूडला ओळख झाली. ‘सडक’ या हिंदी चित्रपटात त्यांनी साकारलेली तृतीयपंथीयाची भूमिका विशेष गाजली होती. या भूमिकेसाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट खलनायक’ म्हणून गौरविण्यात आले होते. हिंदी चित्रपटात त्यांनी खलनायकी आणि विनोदी अशा दोन्ही भूमिका समर्थपणे साकार केल्या होत्या. अभिनेत्याबरोबरच अमरापूरकर यांची ओळख सामाजिक भान असलेला कलाकार अशीही होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या चळवळीतही ते सहभागी झाले होते. अमरापूरकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात सोमवारी सकाळी अकरा वाजल्यानंतर काही काळ ठेवण्यात आले होते. अमरापूरकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी अहमदनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा