मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्टचे अतिरिक्त आणि अनधिकृत बांधकाम एका महिन्याच्या आत स्वखर्चाने पाडण्याच्या हमीचे पालन करण्यात अपयश आल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली. तसेच, त्यांनी हे बांधकाम दहा दिवसांत पाडण्याची नव्याने हमी दिली.

रिसॉर्टचा दुसरा मजला पाडण्यात अनेक अडचणी येत आहेत. परिणामी, रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम पाडण्यास वेळ लागत असून त्यामुळे विलंब झाल्याचे कदम यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, न्यायालयाला दिलेल्या हमीचे पालन करण्यात अयपश आल्याबद्दल कदम यांनी न्यायालयात उपस्थित राहून न्यायालयाची माफी मागितली. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने त्यांची माफी स्वीकारली.

हेही वाचा…समृध्दी महामार्ग विस्तारीकरण; नागपूर-चंद्रपूरसाठी २२, भंडारा-गडचिरोलीसाठी चार, तर नागपूर-गोंदियासाठी २० निविदा

रिसॉर्टचे अतिरिक्त आणि अनधिकृत भाग एका महिन्यांत पाडण्यात येईल, अशी तोंडी हमी कदम यांनी मार्चमधील सुनावणीच्या वेळी न्यायालयात दिली होती. त्याबाबतचे प्रतिज्ञापत्रही कदम यांनी नंतर न्यायालयात सादर केले. न्यायालयाने त्यांचे हे हमीपत्र दाखल करून घेतले. त्याचवेळी, या हमीचे पालन न केल्यास, इतर कारवाईव्यतिरिक्त कदम यांच्यावर अवमान कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर, कदम यांनी हमीचे पालन करण्यात आलेल्या अपयशाबद्दल स्वत: न्यायालयात उपस्थित राहून माफी मागितली.

हेही वाचा…करकरे, साळसकर यांच्या हत्येबाबत नवे प्रश्न; प्रकाश आंबडेकरांचे उज्ज्वल निकम यांना आव्हान, म्हणाले…

दरम्यान, कदम यांनी रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या ६ डिसेंबर २०२३ रोजीच्या आदेशाला आव्हान दिले होते. तसेच, आपल्यावरील कारवाई ही कुहेतूने असून परिसरात सागरी किमारा क्षेत्र नियमावलीचे (सीआरझेड) उल्लंघन करून अनेक बेकायदेशीर बांधकामे उभी राहिल्याचा दावा केला होता. त्यावर, अन्य बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली न जाणे हे याचिकाकर्त्याने बांधलेल्या आणि बेकायदा ठरण्यात आलेल्या संरचनेचे संरक्षण करण्याचे कारण असू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते व कदम यांना रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम पाडणार की नाही ? याबाबत भूमिका स्पष्ट करायला सांगितले होते. त्यानंतर, कदम यांनी रिसॉर्टचे अतिरिक्त व अनधिकृत बांधकाम स्वखर्चाने पाडण्याची तयारी दाखवली होती.

Story img Loader