समाजातील उपेक्षितांच्या, वंचितांच्या आणि दुर्बलांच्या सेवेसाठी स्वार्थनिरपेक्षपणे उभे आयुष्य झोकून देऊनही स्वतला अहंपणाचा वारादेखील स्पर्शू न देणाऱ्या अनामिक सेवाव्रतींची, अशा कामाला हातभार लावून सेवाकार्याचे समाधान शोधणाऱ्या असंख्य दात्यांची आणि कोणताही गाजावाजा न होता उभ्या राहिलेल्या आभाळाएवढय़ा सेवाकार्याची अनोखी ओळख एका आगळ्या कार्यक्रमातून झाल्याने उपस्थितांच्या माना आज आदराने झुकून गेल्या.. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’उपक्रमातून असंख्य वाचकांपर्यंत पोहोचलेल्या निवडक दहा संस्थाना मिळालेल्या उदंड आर्थिक प्रतिसादाचा आणि समाजातील या दातृत्वाचा नम्र स्वीकार करतानाच या संस्थांनी समाजातही सेवाकार्याची एक उमेदही रुजविली..
‘महाराष्ट्राला सामाजिक कार्याची आणि सेवाभावाची फार मोठी परंपरा आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पडद्याआड राहून कामे करणाऱ्या या दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमामुळे समाजाला झाली. आपण सुरू केलेले हे कार्य किती महान आहे, याचा प्रत्यय या उपक्रमातून मिळालेल्या प्रतिसादामुळे संस्थाना आला असेल’, असे ज्येष्ठ अभिनेते व विविध सामाजिक कामांत सहभागी असणारे सदाशिव अमरापूरकर यांनी भारावल्या स्वरातच सांगितले. ‘माझ्या दृष्टीने हा तर अनामिक कार्याचा सत्कार आहे’, असे गौरवोद्गार काढून त्यांनी या उपक्रमाचीही प्रशंसा केली.
शनिवारी, धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला एक्स्प्रेस टॉवर्समधील लोकसत्ता कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘सर्वकार्येषु सर्वदा निधी प्रदान समारंभा’त अमरापूरकर यांच्या हस्ते या संस्थांच्या प्रतिनिधींना धनादेश आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. ‘लोकसत्ता’मध्ये आमच्या कामाची माहिती आल्यादिवसापासून आजपर्यंत अखंड दूरध्वनी, पत्रे आणि मदतीचा ओघ सुरू आहे. तसेच यामुळे आम्हाला अनेक तरुण कार्यकर्तेही सापडले, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत सर्वच संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले, तेव्हा त्यांच्या अनुभवांची गाथा ऐकताना अवघे सभागृहदेखील अक्षरश भारावून गेले होते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध सामाजिक प्रश्नांसाठी काम करणाऱ्या दहा विविध संस्थांच्या कामाचा परिचय लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाद्वारे वाचकांना करून दिला होता. कोकणातील चिपळूणचे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, खान्देशातील धुळ्याचे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळ, ठाणे जिल्ह्णाातील खिडकाळीची साईधाम वृद्धाश्रम, मुंबईची मराठी विज्ञान परिषद, विदर्भाच्या मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्र, नाशिकची घरकुल परिवार संस्था, सोलापूरचे रुग्णोपयोगी वस्तूसंग्रह केंद्र, कल्याणचा कल्याण गायन समाज, सोलापूरचेच विज्ञानग्राम आणि पुण्याच्या मानव्य या संस्थांची कामे वृद्धिंगत व्हावीत, यासाठी आर्थिक हातभार लावण्याच्या लोकसत्ताच्या आवाहनास मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे, सेवाभावाचा आदर करण्याच्या आणि सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या महाराष्ट्राच्या परंपरेचाही प्रत्यय या कार्यक्रमातून प्रतिबिंबित झाला.
आज आपण एका वेगळ्या कामाच्या समाधानाने भारावलो आहोत अशी पारदर्शक भावना सदाशिव अमरापूरकर यांनी व्यक्त केली, आणि टाळ्यांचा गजर करून उपस्थितांनीही याच भावनेशी सहमती दर्शविली. एका हृदयस्पर्शी काव्याच्या काही ओळींतून आपल्या भावना व्यक्त करीत अमरापूरकर यांनी या सेवाकार्याचा गौरव केला. मानवाची सेवा ही सर्वात महान सेवा आहे, या महात्मा गांधीच्या वचनाचा प्रत्यय या सेवाकार्यातून जागोजागी येताना दिसतोच ,पण वर्तमानपत्रांवर आज जनतेचा सर्वाधिक विश्वास आहे याचाही प्रत्यय अशा उपक्रमांतून येतो. लोक किती मदत करतात आणि संस्था कशा वटवृक्षासारख्या उभ्या राहतात, याचे जिवंत उदाहरण आपण आज लोकसत्ताच्या कार्यक्रमातून आपण अनुभवले, असेही अमरापूरकर म्हणाले. वेदनांच्या या महासागरापुढे रामायण, महाभारत आणि गीताही तोकडय़ा पडाव्यात, असे सांगून, माझ्या आयुष्यातील उत्तरकाळ अशाच प्रकारे लोकांची दुखे दूर करण्यात जावा, अशी भावोत्कट इच्छाही त्यांनी व्यक्त केली. आनंदाच्या गोष्टी सांगणारे हजारो असतात, पण आपल्या व्यथा सांगणारे कोणी नसते. या लोकांनी अशा व्यथा जाणून घेतल्या, आणि त्यांचे अश्रू पुसले, हे खऱ्या अर्थाने परमेश्वराचे काम आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या, आणि टाळ्यांच्या गजरातून सहमतीचा सूर सभागृहात घुमला..
प्रारंभी एक्स्प्रेस समूहाच्या मुद्रक, प्रकाशक वैदेही ठकार यांनी पुष्पगुच्छ देऊन अमरापुरकर यांचे स्वागत केले. ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी कार्यक्रमादरम्यान या उपक्रमाची रूपरेषा विशद केली. तर सूत्रसंचालन ‘लोकप्रभा’चे कार्यकारी संपादक विनायक परब यांनी केले. ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी आभार प्रदर्शन केले.
‘चेहऱ्यावर हसू, मनात वेदना’
२६ जुलैच्या पावसात संपूर्ण ग्रंथधन पाण्यात जाऊनही आज ताठ मानेने उभी राहिलेले लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, अनेक व्याधींनी जर्जर झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देणारे रुग्णोपयोगी वस्तूसंग्रह केंद्र, ‘एड्सग्रस्त मुलांना सुखाचे मरण द्यायचे आहे,’ असे सांगत काम करणारी ‘मानव्य’ ही संस्था, तर केवळ बांबूंच्या आधारावर एका मोठय़ा समाजाला सक्षम बनवण्याचे ध्येय ठेवणारे संपूर्ण बांबू केंद्र.. या सर्वच संस्थांची कामे उदात्त आहेत. या संस्थांसमोरच्या अडचणी ऐकून मन हेलावून गेले. आज व्यासपीठावर बसलो होतो म्हणून चेहऱ्यावर सक्तीचे हसू होते. पण मनातून मात्र एक आक्रंद सुरू होता. ‘लोकसत्ता’चा हा उपक्रम खरोखरच खूप उदात्त आहे.
चांगल्या गोष्टीसाठी आर्थिक मदत करण्यास
उद्युक्त करणारा उपक्रम
‘लोकसत्ता’चा हा उपक्रम महत्त्वाचा आहे. सामाजिक काम करणाऱ्या लोकांना, तसेच संस्थांना मदत करण्याची इच्छा अनेकांना असते. पण पुरेसा विश्वास नसतो. ‘लोकसत्ता’कडून जेव्हा अशा संस्थांची माहिती मिळते तेव्हा त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता वाढते. त्यामुळेच मदत करण्यासाठी स्वतच्या खिशात हात घालावासा वाटतो. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे चांगल्या कार्यासाठी लोकांना आपल्या खिशात हात घालायची सवय लागेल. सामाजिक कार्य नेहमी करावेसे वाटते, पण प्रत्येक ठिकाणी जाऊन मदत करणे शक्य होत नाही. ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून हे सहजशक्य झाले आहे.
– मीनाक्षी मेस्त्री
उपक्रम खूपच चांगला
‘लोकसत्ता’चा हा उपक्रम खूप चांगला आहेच. सामाजिक संस्था आणि देणगीदारांचा एकत्र कार्यक्रम घडवून आणला तोही उत्तम उपक्रम म्हणावा लागेल. मी आणि माझी पत्नी सुलभा थत्ते आम्ही दोघांनीही निवृत्ती घेतली आहे. निवृत्ती वेतनामधील काही रक्कम या संस्थांना द्यावी अशी आमची इच्छा होती. माझ्या पत्नीचा मुद्दाम उल्लेख करतो कारण तिनेच हा निधी देला आहे.
-सुधाकर थत्ते
संस्थांचे अनुभव ऐकून आणखी मदत करावीशी वाटते
आपण स्वत काही सामाजिक कार्य करू शकत नाही, तर निदान असे भरीव कार्य करणाऱ्यांना जमेल तेवढी मदत देऊ शकलो तर.. या एका विचाराने आम्ही हे पाऊल उचलले आहे. आमची आर्थिक क्षमता आहे. आपल्या मिळकतीमधील काही वाटा या संस्थांना दिला तर या संस्थांच्या आर्थिक अडचणी काही अंशी दूर होण्यास मदत होईल. म्हणून आमच्याकडून जे शक्य होते ते आम्ही केले. या कार्यक्रमात प्रत्यक्ष त्या संस्थाचालकांकडून त्यांच्या कार्याची माहिती मिळाली. त्यांच्या अडचणी आणि कार्य याबद्दल ऐकल्यानंतर आपण आणखी मदत करायला हवी याची जाणीव झाली.
-अजय कोरे
दिलेल्या मदतीचा योग्य वापरला होणार याचे समाधान
‘लोकसत्ता’चा हा उपक्रम मनापासून आवडला आणि म्हणूनच सामाजिक कार्यासाठी आम्ही आमचा खारीचा वाटा उचलला. आम्ही याआधीही सामाजिक संस्थांना मदत करीत होतो. पण, आज येथे उपस्थित संस्थांच्या प्रतिनिधींचे मनोगत ऐकल्यानंतर आपला पैसा योग्य ठिकाणी वापरला जाईल, याचे समाधान वाटले. माझा मुलगा जव्हारला आदिवासींबरोबर काम करतो. आज आपणही अप्रत्यक्षपणे का होईना काहीतरी सामाजिक कार्य करू शकलो, याचाही आनंद झाला.
– नीला महाजन-पळसुले
‘लोकसत्ता’मुळे मोठा परिवार जोडला गेला
‘मर्फी’ कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर वृद्धांची सेवा करण्यासाठी सुरू केलेली छोटीशी संस्था म्हणजे आमचा साईधाम वृद्धाश्रम! दोन महिन्यांपूर्वी आमच्या वृद्धाश्रमाचे कार्य अत्यंत छोटय़ा स्तरावर होते. मात्र ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात आमच्या संस्थेची माहिती प्रसिद्ध झाली आणि मुंबई, महाराष्ट्रातूनच नाही, तर देशभरातून आम्हाला विचारपूस करणारे, मदतीची इच्छा व्यक्त करणारे दूरध्वनी यायला लागले. दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी विखुरलेल्या मराठी माणसांनी आवर्जून आमच्या संस्थेच्या कार्याची दखल घेतली. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे आम्हाला आर्थिक मदत तर मिळणार आहेच. पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे ‘लोकसत्ता’चा वाचक म्हणून एक मोठा परिवार आमच्याशी जोडला गेला.
– गीता कुलकर्णी, साईधाम वृद्धाश्रम (खिडकाळी)
‘आम्ही दान कधीच मागत नाही’
देशातल्या कोणत्याही वनक्षेत्रात राहणारा आदिवासी माणूस कधी भीक मागताना किंवा खोटे बोलताना दिसणार नाही. या आदिवासींना अधिक सक्षम करण्यासाठी मेळघाटमध्ये आम्ही संपूर्ण बांबू केंद्राचा घाट घातला. मेळघाट हा साधारणपणे कुपोषणासाठी प्रसिद्ध आहे. पण कुपोषित समजल्या जाणाऱ्या मेळघाटमधील माझ्या मुलांनी भूजमध्ये भूकंपानंतर तब्बल ७४५ बांबूंची घरे बांधून दिली. त्याचबरोबर बिहारच्या कुशीनगरमध्ये आम्ही बांबूंच्या मदतीने अनेक घरे, स्वच्छतागृहे बांधली आहेत. आदिवासींना स्वयंपूर्ण करण्याकडे आमचा कल असतो. पण आम्ही कधीच कोणाकडे दान मागत नाही. कारण ते घेताना एक मिंधेपण येते. मात्र ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी केलेली ही मदत ही दानाच्या भावनेतून नाही, तर आमच्या कामाला दिलेली पावती आहे.
सुनील देशपांडे, संपूर्ण बांबू केंद्र (लवादा)
गरज ‘घरकुल’ बंद होण्याची
‘घरकुल परिवार संस्थे’ला ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. पण माझ्या मते असे ‘घरकुल’ बंद होण्याची गरज जास्त आहे. मतिमंद मुले ही सर्व समाजाची जबाबदारी आहे. सध्याची परिस्थिती पाहता समाजात एकाच नाही, अनेक ‘घरकुलां’ची गरज आहे. पण हे सुदृढ समाजाचे लक्षण नाही. त्यामुळे ‘घरकुल’ बंद होण्यासारखी परिस्थिती निर्माण व्हायला हवी.
– विद्या फडके, घरकुल परिवार संस्था (नाशिक)
हीच खरी ईश्वर सेवा
वृत्तपत्रे ही राजकीय पक्षांची तळी उचलत असतात, असा सर्वसामान्य नागरिकांचा समज असतो. पण हा गैरसमज असल्याचे ‘लोकसत्ता’ने सिद्ध करून दाखविले आहे. सामाजिक बांधिलकीचा वसा जपत आणि समाजाभिमूख काम करण्याचा अविरत प्रयत्न ‘लोकसत्ता’ परिवराकडून करण्यात येत आहे.
-डॉ. स्नेहल सोनवणे
इतिहास विभाग प्रमुख, के.टी.एच.एम कॉलेज नाशिक