समाजातील उपेक्षितांच्या, वंचितांच्या आणि दुर्बलांच्या सेवेसाठी स्वार्थनिरपेक्षपणे उभे आयुष्य झोकून देऊनही स्वतला अहंपणाचा वारादेखील स्पर्शू न देणाऱ्या अनामिक सेवाव्रतींची, अशा कामाला हातभार लावून सेवाकार्याचे समाधान शोधणाऱ्या असंख्य दात्यांची आणि कोणताही गाजावाजा न होता उभ्या राहिलेल्या आभाळाएवढय़ा सेवाकार्याची अनोखी ओळख एका आगळ्या कार्यक्रमातून झाल्याने उपस्थितांच्या माना आज आदराने झुकून गेल्या.. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’उपक्रमातून असंख्य वाचकांपर्यंत पोहोचलेल्या निवडक दहा संस्थाना मिळालेल्या उदंड आर्थिक प्रतिसादाचा आणि समाजातील या दातृत्वाचा नम्र स्वीकार करतानाच या संस्थांनी समाजातही सेवाकार्याची एक उमेदही रुजविली..
‘महाराष्ट्राला सामाजिक कार्याची आणि सेवाभावाची फार मोठी परंपरा आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पडद्याआड राहून कामे करणाऱ्या या दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमामुळे समाजाला झाली. आपण सुरू केलेले हे कार्य किती महान आहे, याचा प्रत्यय या उपक्रमातून मिळालेल्या प्रतिसादामुळे संस्थाना आला असेल’, असे ज्येष्ठ अभिनेते व विविध सामाजिक कामांत सहभागी असणारे सदाशिव अमरापूरकर यांनी भारावल्या स्वरातच सांगितले. ‘माझ्या दृष्टीने हा तर अनामिक कार्याचा सत्कार आहे’, असे गौरवोद्गार काढून त्यांनी या उपक्रमाचीही प्रशंसा केली.
शनिवारी, धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला एक्स्प्रेस टॉवर्समधील लोकसत्ता कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘सर्वकार्येषु सर्वदा निधी प्रदान समारंभा’त अमरापूरकर यांच्या हस्ते या संस्थांच्या प्रतिनिधींना धनादेश आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. ‘लोकसत्ता’मध्ये आमच्या कामाची माहिती आल्यादिवसापासून आजपर्यंत अखंड दूरध्वनी, पत्रे आणि मदतीचा ओघ सुरू आहे. तसेच यामुळे आम्हाला अनेक तरुण कार्यकर्तेही सापडले, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत सर्वच संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले, तेव्हा त्यांच्या अनुभवांची गाथा ऐकताना अवघे सभागृहदेखील अक्षरश भारावून गेले होते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध सामाजिक प्रश्नांसाठी काम करणाऱ्या दहा विविध संस्थांच्या कामाचा परिचय लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाद्वारे वाचकांना करून दिला होता. कोकणातील चिपळूणचे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, खान्देशातील धुळ्याचे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळ, ठाणे जिल्ह्णाातील खिडकाळीची साईधाम वृद्धाश्रम, मुंबईची मराठी विज्ञान परिषद, विदर्भाच्या मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्र, नाशिकची घरकुल परिवार संस्था, सोलापूरचे रुग्णोपयोगी वस्तूसंग्रह केंद्र, कल्याणचा कल्याण गायन समाज, सोलापूरचेच विज्ञानग्राम आणि पुण्याच्या मानव्य या संस्थांची कामे वृद्धिंगत व्हावीत, यासाठी आर्थिक हातभार लावण्याच्या लोकसत्ताच्या आवाहनास मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे, सेवाभावाचा आदर करण्याच्या आणि सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या महाराष्ट्राच्या परंपरेचाही प्रत्यय या कार्यक्रमातून प्रतिबिंबित झाला.
आज आपण एका वेगळ्या कामाच्या समाधानाने भारावलो आहोत अशी पारदर्शक भावना सदाशिव अमरापूरकर यांनी व्यक्त केली, आणि टाळ्यांचा गजर करून उपस्थितांनीही याच भावनेशी सहमती दर्शविली. एका हृदयस्पर्शी काव्याच्या काही ओळींतून आपल्या भावना व्यक्त करीत अमरापूरकर यांनी या सेवाकार्याचा गौरव केला. मानवाची सेवा ही सर्वात महान सेवा आहे, या महात्मा गांधीच्या वचनाचा प्रत्यय या सेवाकार्यातून जागोजागी येताना दिसतोच ,पण वर्तमानपत्रांवर आज जनतेचा सर्वाधिक विश्वास आहे याचाही प्रत्यय अशा उपक्रमांतून येतो. लोक किती मदत करतात आणि संस्था कशा वटवृक्षासारख्या उभ्या राहतात, याचे जिवंत उदाहरण आपण आज लोकसत्ताच्या कार्यक्रमातून आपण अनुभवले, असेही अमरापूरकर म्हणाले. वेदनांच्या या महासागरापुढे रामायण, महाभारत आणि गीताही तोकडय़ा पडाव्यात, असे सांगून, माझ्या आयुष्यातील उत्तरकाळ अशाच प्रकारे लोकांची दुखे दूर करण्यात जावा, अशी भावोत्कट इच्छाही त्यांनी व्यक्त केली. आनंदाच्या गोष्टी सांगणारे हजारो असतात, पण आपल्या व्यथा सांगणारे कोणी नसते. या लोकांनी अशा व्यथा जाणून घेतल्या, आणि त्यांचे अश्रू पुसले, हे खऱ्या अर्थाने परमेश्वराचे काम आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या, आणि टाळ्यांच्या गजरातून सहमतीचा सूर सभागृहात घुमला..
प्रारंभी एक्स्प्रेस समूहाच्या मुद्रक, प्रकाशक वैदेही ठकार यांनी पुष्पगुच्छ देऊन अमरापुरकर यांचे स्वागत केले. ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी कार्यक्रमादरम्यान या उपक्रमाची रूपरेषा विशद केली. तर सूत्रसंचालन ‘लोकप्रभा’चे कार्यकारी संपादक विनायक परब यांनी केले. ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी आभार प्रदर्शन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा