बोलके डोळे, चेहऱ्यावरचा निरागस भाव, ठाशीव बोलणे या बळावर साठच्या दशकात हिंदूी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या साधना शिवदासांनी यांचे शुक्रवारी हिंदुजा रूग्णालयात निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या.
नायिका म्हणून आपली सुंदर प्रतिमा चाहत्यांच्या मनात कायम रहावी, या इच्छेने गेली अनेक वर्ष प्रसिद्धी माध्यमांपासूनही दूर राहिलेल्या साधना या राहत्या घराच्या वादातून काही महिन्यांपूर्वीच माध्यमांसमोर आल्या होत्या. त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ‘मेरे मेहबूब’, ‘मेरा साया’, ‘वक्त’, ‘लव्ह इन सिमला’ सारख्या चित्रपटांमधून आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. ‘गीता मेरा नाम’ आणि ‘पती परमेश्वर’ हे चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केले होते. त्यांच्यावर शनिवारी दुपारी १२ वाजता सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Story img Loader