ट्विटरवर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण एका वृद्ध साधूला मारहाण करत आहेत, तसेच त्याला शिव्या देताना दिसत आहेत. या तरुणांनी त्या साधूला केशकर्तनालयात नेऊन त्याचे केस कापल्याचं दिसतंय. काही जणांनी हा व्हिडीओ ट्विटरसह सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओसह कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हा व्हिडीओ मुंबईचा असून मुंबईत काही एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांनी वृद्ध साधूला मारहाण केली आहे.
हा व्हिडीओ शेअर करत काही नेटीझन्सनी कारवाईची मागणी केली आहे. एका युजरने म्हटलं आहे की “मुंबईत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या समर्थकांनी वृद्ध साधूला निर्दयीपणे मारहाण केली आणि हिंदू धर्माचा अपमान केला, कृपया या दहशतवादी लोकांवर कायदेशीर कारवाई करा”. या ट्वीटमध्ये युजरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस, एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना मेन्शन करत त्यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.
हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर मुंबई पोलिसांनी याची दखल घेतली असून व्हिडीओची सत्यता सांगितली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विट हँडलवरून हे ट्वीट रिट्वीट केलं आहे. तसेच स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की “व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबईचा नसून मध्य प्रदेशातल्या खांडवा येथील आहे. तसेच ही घटना मे २०२२ मधली आहे. याप्रकरणी खांडवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” यासह कोणताही व्हिडीओ अथवा माहिती शेअर करण्यापूर्वी त्याची पडताळणी करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.
हे ही वाचा >> आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय कधी? विधानसभा अध्यक्षांनी दिली मोठी माहिती, म्हणाले…
दरम्यान, काही युजर्सनी हा खोटा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. फेक व्हिडीओ व्हायरल करून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशा आशयाच्या कमेंट्स मुंबई पोलिसांच्या ट्विटवर दिसत आहेत.