होळी, दहीहंडी अशा उत्सवांनंतर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हमखास जखमींची गर्दी होते. होळीच्या निमित्ताने ‘बुरा ना मानों’ म्हणत वाट्टेल ते रंग उधळले जातात. मात्र यंदा मुंबईकरांनी कमीत कमी पाण्याचा वापर करीत अत्यंत सुरक्षितपणे होळी खेळण्याचा संकल्प तडीस नेला. यंदा रंगांमुळे अपाय होण्याच्या तुरळक घटना वगळल्या, तर मुंबईकरांची होळी आणि धुळवड दोन्ही अत्यंत सुरक्षितपणे पार पडली.
दरवर्षी रंगांमुळे डोळ्यांची जळजळ होणे, त्वचेवर चट्टे उठणे अशा अनेक त्रासांनी पीडित रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात धाव घेतात. तसेच फुगा लागल्याने जखमी झालेल्यांचे प्रमाणही लक्षणीय असते. यंदा मात्र हे प्रमाण नगण्य होते. धुळवडीत जखमी झालेल्या १० ते १२ जणांवर केईएम रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागात उपचार करुन घरी पाठविण्यात आले. धुळवड खेळताना जखमी झालेल्या चौघांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. पण त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले. तसेच रंगामुळे डोळे चुरचुरण्याची तक्रार घेऊन तिघे जे. जे. रुग्णालयात दाखल झाले होते. परंतु उपचार करुन त्यांनाही घरी पाठविण्यात आले.
धुळवडीच्या दिवशी रेल्वेमार्गालगतच्या वस्त्यांमधून रेल्वेमार्गावर पाण्याचे आणि घाणीच्या पाण्याचे फुगे मारण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाली होती. मात्र सोमवारी अशी एकही घटना नोंदवली गेली नाही. यापूर्वी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारच्या सर्वाधिक घटनांची नोंद झाली आहे. मात्र सोमवारी अशी एकही घटना घडली नसल्याचे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी धुमाळ यांनी सांगितले.
आम्ही रेल्वेमार्गालगत गस्तपथके ठेवली होती. त्याचप्रमाणे अशा प्रकारे फुगे मारणाऱ्यांना अटक होऊ शकते, असा संदेश प्रसारमाध्यमांमार्फत पोहोचवण्यात आला होता. त्यामुळे यंदा असे प्रकार घडले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रेल्वेमार्गावर असे कोणतेही प्रकार घडले नसल्याची माहिती लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा