लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने पावसाळापूर्व कामे पूर्ण केली असून मुख्यतेः घाट भागातील कामांवर विशेष भर देण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने व्यापक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे यंदा पावसाळ्यात घाट भागात रेल्वेगाड्या सुरक्षित धावण्यास सज्ज असणार आहेत.
मध्य रेल्वेच्या घाट भागात दरड कोसळून रेल्वे मार्ग ठप्प होण्याच्या अनेक घटना घडल्यात. तसेच पावसामुळे रेल्वे रूळांचे नुकसान, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेत बिघाडाचे प्रकार घडले आहेत. रेल्वे मार्ग बंद झाल्याने, मालगाड्या, रेल्वेगाड्यांचा प्रवास थांबून मध्य रेल्वेला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागते. यातच, युद्धपातळीवर रेल्वे सेवा सुरू करण्याचे कामे हाती घ्यावी लागतात. त्यामुळे यंदा मध्य रेल्वे प्रशासनाने पावसाळापूर्व कामे केली. यात योग्य नियोजन करून, प्रशिक्षित कामगारांचे पथक, पोकलेन, बोल्डर ट्रेन, सीसी टीव्ही कॅमेरा आदींचा वापर करून घाट भागातील प्रवास सुरक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आणखी वाचा-एसटीमधील बदल्या पारदर्शक होणार, एसटी महामंडळातील सर्व विनंती बदल्या आता ऑनलाइन पद्धतीने
पावसाळापूर्व कामांमध्ये सर्वाधिक कठीण काम घाट भागातील असते. एका बाजूला उंच चढ, तर, दुसऱ्या बाजूला खोल दरी व मध्यभागी रेल्वे मार्गिका. त्यामुळे पावसाळ्यात सुरक्षितपणे कामे करणे आव्हानात्मक आहे. अनेक ठिकाणी यंत्रणा पोहचवण्यासाठी खूप अडचणीचे होते. मात्र, त्यावर मात करून, कामे केली जातात. परंतु, काही वेळा पावसाचा जोर एवढा असतो. अवघ्या काही तासांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे मुसळधार पावसामुळे घाट भागात रेल्वे रूळ वाहून जाणे, रूळावर माती साचणे, पाणी जमा होणे, झाडे पडणे अशा घटना घडतात. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मध्य रेल्वेने घाट भागावर विशेष लक्ष दिले.
दरड पडू नये यासाठी मध्य रेल्वेच्या घाट भागात ५० हजार चौ.मी. बोल्डर जाळीचे आवरण बसवण्यात आले आहे. ४५० मीटर कॅनेडियन फेन्सिंग लावण्यात आली आहे, त्यामुळे रेल्वे रूळावर येणारे दगड, माती रोखता येईल. पावसाच्या पाण्याचा प्रवाह वळवण्यासाठी १,२०० मीटर कॅच वॉटर ड्रेन तयार करण्यात आले आहेत. बोगद्याच्या दर्शनी भागाजवळ दगड पडणे / चिखल साचणे अशा घटना टाळण्यासाठी बोगद्याच्या दर्शनी भागाचा १७० मीटने विस्तार करण्यात आला आहे. टेकड्यांवरून खाली येणारे खडक रोखण्यासाठी ६५० मीटर रॉकफॉल बॅरियर बसवण्यात आले आहेत. यासह १३ ठिकाणी बोल्डर कॅचिंग आणि १८ ठिकाणी टनेल साउंडिंगचा बसवले आहेत.
आणखी वाचा-मुलुंडमध्ये मोटारीच्या धडकेत तरुण जखमी
पावसाळ्यात बोगद्यातील हालचाली, घाट भागातील अद्ययावत माहिती देण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. घाट भागात वापरण्यात आलेल्या साधनांच्या मजबूतीची तपासणी करण्यात आली आहे. आयआयटी मुंबई आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तज्ञांशी चर्चा करून पूर्व पावसाळी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.