मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने गेल्यावर्षी नगरविकास विभागाच्या सहकार्याने हाती घेतलेला ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ हा उपक्रम नव्या राज्य सरकारच्या काळात बारगळला आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने गुंडाळून ठेवला आहे. आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून याबद्दल नाराजी व्यक्त केली. १८६ शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार होता.
मुंबई महानगरपालिका शाळांच्या आवारात तसेच सभोवतालच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विविध प्रकल्प राबवण्याचा संकल्प महानगरपालिका प्रशासनाने आधीच्या सरकारच्या काळात घेतला होता. सुरक्षित शाळा या विषयाचे सुतोवाच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातही केले होते. त्याकरिता ५० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. या प्रकल्पाची सुरुवात मे २०२२ मध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते. मात्र नंतर जूनमध्ये राज्यात सत्तांतर झाले. नवीन सरकारच्या काळात आता हा प्रकल्प बारगळला आहे.
प्रत्येक शाळेच्या ५०० मीटर परिघामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वावरता आले पाहिजे. त्यासाठी चांगले पदपथ, पथदिवे, रस्ते, बसथांबे, रस्ता ओलांडण्याची सुविधा इत्यादी सर्व आवश्यक असतात. शाळेमध्ये येणारय़ा प्रत्येक विद्यार्थ्यांची डेंटल, मेंटल आणि डायबिटीज अर्थात दंत, मानसिक आणि मधुमेह या तीन आरोग्य पैलूंच्या दृष्टीकोनातून काळजी घेता येईल, असे या उपक्रमाचे स्वरूप होते.
उपक्रम काय?
मुंबईतील शाळांमध्ये जाणारे सुमारे ६० टक्के विद्यार्थी पायी शाळेत जातात. ही मुले वाहतूक वर्दळीला सामोरी जात असतात. शाळेत जाणाऱ्या मुलांना अपघात होण्याचे प्रमाणही मोठे असून सुमारे ७४ टक्के विद्यार्थ्यांचे अपघात हे शाळेच्या ५०० मीटर परिसरात होतात. त्यामुळे पालिकेने हा उपक्रम हाती घेतला होता. त्याअंतर्गत शाळांच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर रंगीबेरंगी पट्टे मारणे, शाळा जवळच्या पदपथावर रेलिंग नसणे, शाळेच्या परिसरात वाहतूक वेगावर मर्यादा आणणे असे विविध उपाय केले जाणार आहेत. या उपक्रमामुळे एक लाख मुलांना लाभ होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला होता. सोमवारी सर्वत्र बालदिन साजरा केला जात असताना या बारगळलेल्या प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.