मुंबई : धारावी पुनर्विकासासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईतील जमिनी एका उद्योजकाला देण्यास विरोध करणारे मुलुंडमधील सामाजिक कार्यकर्ते ऍड. सागर देवरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मुलुंडमध्ये प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधण्यासही देवरे यांनी विरोध केला होता. देवरे यांनी शनिवारी मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवबंधन बांधून शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांकरीता घरे बांधण्यासाठी संबंधित प्राधिकरणाने मुंबईतील विविध ठिकाणच्या जागांची मागणी केली आहे. मुंबईतील जमिनी मोठ्या संख्येने धारावी पुनर्विकास प्रकल्पाकरीता देण्यास सुरुवातीपासून विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते ऍड. सागर देवरे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला. यावेळी माजी आमदार रमेश कोरगावकर, माजी खासदार विनायक राऊत उपस्थित होते.
मुंबई महापालिकेने मुलुंड, भांडूपमध्ये प्रकल्पबाधितांसाठी दहा हजार घरे बांधण्याचे ठरवले असून त्याच्या कामाला देवरे यांनी विरोध केला होता. देवरे यांनी या प्रकरणी मुलुंडमध्ये मोठे जनआंदोलन उभे केले होते. तसेच मुलुंडमध्ये प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधणार नाही असे आश्वासन भाजपच्या काही नेत्यांनी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर दिले होते. मात्र प्रत्यक्षात तिथे घरे बांधली जात असल्याची बाब उघड करीत त्यांनी भाजपच्या काही नेत्यांना आव्हानच दिले होते.
त्यानंतर धारावी प्रकल्पासाठी मुलुंड आणि पूर्व उपनगरातील जमिनी मोठ्या प्रमाणावर देण्याबाबतचे निर्णय घेतले जात असताना त्यालाही देवरे यांनी विरोध केला होता. देवरे यांनी माहिती अधिकारात धारावी प्रकल्पासाठी एकूण किती जमिनी दिल्या त्याची माहिती उजेडात आणली होती. तेव्हापासून देवरे हे चर्चेत आहेत.
धारावी प्रकल्पाच्या नावाखाली मुंबई एका उद्योजकाच्या घशात घालण्याचा डाव आखला जात आहे त्या विरोधात तसेच मुलुंडकरांच्या आंदोलनात आता शिवसेनेची (ठाकरे) वज्रमूठ करून लढा उभारला जाईल, अशा इशारा देवरे यांनी या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने दिला आहे. नव्या आशेने ..नव्या दिशेकडे असे घोषवाक्य देत त्यांनी आपल्या पक्षप्रवेशाची माहिती समाज माध्यमांवरून दिली आहे.
कांजूरमार्ग येथील पालिकेच्या कचराभूमीतून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या दुर्गंधीमुळे पूर्व उपनगरातील लाखो लोकांचे जगणे धोक्यात आल्याचा आरोप करीत त्यांनी नुकतीच मुंबई महापालिका प्रशासनाला कायदेशीर नोटीसही धाडली आहे.