मुंबईः कुटुंबियांपासून लपवून केलेली थायलंड ट्रीप ५१ वर्षीय पुणेकराला भलतीच महाग पडली आहे. या प्रवासाबाबतची माहिती कुटुंबियांपासून लपवण्यासाठी त्याने पारपत्राची चार पाने फाडली. त्यामुळे त्याला मुंबई विमानतळावर अडवण्यात आले. याप्रकरणी सहार पोलिसांनी प्रवाशाविरोधात पारपत्रात छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पाने फाडल्यानंतर दुसऱ्यांदा थायलंडवरून परत येत असताना त्याची लबाडी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पकडली.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमातळावर सोमवारी इमिग्रेशन अधिकारी प्रवाशांचे पारपत्र तपासत होते. त्यावेळी एक ५१ वर्षीय प्रवासी थायलंडवरून व्हिएतनाम मार्गे मुंबईत आला होता. त्याचे पारपत्र, इमिग्रेशन व बोर्डिंग पास तपासले असता बोर्डिंगपासवर थायलंडवरून व्हिएतनाम मार्गे मुंबईत आल्याचे दिसून येत होते. पण पारपत्रावर त्याबाबत नोंद नव्हती. इमिग्रेशन अधिकाऱ्याने नीट तपासले असता त्याच्या पारपत्रावरील पान क्रमांक १७ -१८ फाडल्याचे दिसून आले. त्यामुळे अधिकाऱ्याने बारकाईने त्याच्या पारपत्राची तपासणी केली. त्यावेळी २१-२२, २३-२४ व २५-२६ पानेही गायब असल्याचे निदर्शनास आले. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्याने हा प्रकार विंग इन्चार्जला सांगितला व संबंधीत प्रवाशाला चौकशीसाठी आत बोलावले. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार उघड झाला.
दुसऱ्यांदा प्रवास करताना पकडले
आरोपी प्रवासी एक वर्षापूर्वीही थायलंडला गेला होता. ती बाब कुटुंबियांपासून लपवण्यासाठी त्याने पारपत्राची पाने फाडली. त्यामुळे हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला नाही. त्यानंतर एका वर्षांनंतर त्याने पुन्हा ७ ते १३ एप्रिलदरम्यान थायलंडला जाण्याचा बेत आखला. त्यानुसार तो थायलंडला जाऊनही आला. पण वर्षभरापूर्वी केलेली लबाडी कुटुंबियांच्या नाही, पण विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांना जूनी पाने फाडल्याचे निदर्शनास आले. चौकशीत प्रवाशाने कुटुंबियांपासून थायलंड ट्रीप लपवण्यासाठी पाने फाडल्याचे मान्य केले. त्यानंतर प्रवाशाविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल
आरोपीने पारपत्रावर छेडछाड केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तात्काळ याप्रकरणी सहार पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) व पारपत्र कायदा कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने पारपत्रावर छेडछाड केल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी एमआरआरओ विभागाला माहिती देण्यात आली. त्यांच्या निर्देशानंतर तक्रार करण्यात आली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.