मुंबई : साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल दिली जाणारी साहित्य अकादमीची फेलोशिप लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झाली आहे. हा साहित्य अकादमीतील सर्वोच्च सन्मान असून नेमाडे यांच्यासह विविध भाषांतील आठ साहित्यिकांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.
कादंबरी, काव्यसंग्रह, टीकात्मक इत्यादी विविधांगी आशयाची १५ पुस्तके नेमाडे यांनी लिहिली आहेत. लंडन येथील स्कूल ऑफ ओरिएंटल अॅण्ड आफ्रिकन स्टडीजसह आणखी काही विद्यापीठांमध्ये इंग्रजी, मराठी आणि साहित्याचा तुलनात्मक अभ्यास हे विषय शिकवण्याचा अनुभव त्यांना आहे. लघुनियतकालिकांच्या चळवळीतील ते एक आघाडीचे कार्यकर्ते होत.
यापूर्वी नेमाडे यांना पद्माश्री, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, एच.एन. आपटे पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, आर.एस. जोग पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. ते मुंबई विद्यापीठातून निवृत्त झाले असून सध्या गोवा विद्यापीठात कार्यरत आहेत. ताम्रपत्र आणि शाल असे या फेलोशिपचे स्वरूप आहे.
बंगालीतील साहित्यिक शिरशेंदु मुखोपाध्याय, इंग्रजीतील रस्कीन बॉण्ड, हिंदीतील विनोद कुमार शुक्ला, मल्याळममधील एम. लिलावती, पंजाबीतील डॉ. तेजवंत सिंग गिल, संस्कृतमधील स्वामी रामभद्राचार्य, तमिळमधील इंदिरा पार्थासारथी यांनाही साहित्य अकादमीची फेलोशिप प्राप्त झाली आहे.