‘लोकसत्ता’च्या गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘..तर चिपळूण संमेलनाध्यक्ष निवडणूकही ठरते अवैध’ या बातमीने साहित्य वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी मात्र या बातमीविषयी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर निवडणूक प्रक्रियेला आव्हान देण्याची तयारी काही संबंधितांनी सुरू केली असल्याची चर्चा आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही सार्वजिनक विश्वस्त संस्था असून महामंडळाच्या घटनेत कोणताही बदल केला गेला तर त्याबाबत रितसर ठराव (सूचक व अनुमोदक यांच्या स्वाक्षरीसह)करण्याची आवश्यकता असून केलेल्या या बदलाना धर्मादाय आयुक्तांचीही मान्यता घेणे बंधनकारक आहे. तसे जर झाले नाही तर हे सर्व बदल घटनात्मकदृष्टीने अवैध ठरतात.
चिपळूण साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक वाढीव मतदार संख्येबाबतचा रितसर ठराव संमत न करताच झाली. यास धर्मादाय आयुक्तांची मान्यताही मिळालेली नाही. साहित्य महामंडळाच्या घटनेत विश्व मराठी साहित्य संमेलनाची कोणतीही तरतूद नाही. तसेच ‘विश्व मराठी’बाबत महामंडळाने ठराव करण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, या बदलाना धर्मादाय आयुक्तांकडूनही मान्यता मिळालेली नाही. जोपर्यंत विश्व मराठी साहित्य संमेलनाला धर्मादाय आयुक्तांकडून मान्यता मिळत नाही तोपर्यंत या संमेलनासाठी अनुदान दिले जाणार नाही, अशी माहिती माहितीच्या अधिकाराखाली मिळाली आहे. जो निकष विश्व मराठीसाठी लावला गेला तोच निकष वाढीव मतदार संख्येलाही लागू पडतो. त्यामुळे चिपळूण संमेलनाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेला कोणी आव्हान दिले तर त्याची बाजू आता अधिक बळकट ठरू शकेल, असेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या निवडणुकीतील उमेदवार ह. मो. मराठे यांच्याकडे याविषयी विचारणा केली असता, ‘या विषयावर मला कोणतेही भाष्य करायचे नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर प्रा. अशोक बागवे म्हणाले की, वाढीव मतदार संख्येला धर्मादाय आयुक्तांची मान्यता मिळालेली नसेल तर ही निवडणूक कोणत्या नियमानुसार घेण्यात आली? निवडणुकीची प्रक्रिया नियमानुसार आणि कायद्याच्या चौकटीत राहून करण्याची जबाबदारी महामंडळाची आहे. तर डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांनी सांगितले की, साहित्य संमेलन ही भातुकलीच आहे. पण मी भातुकली मन:पूर्वक खेळत असे. यात अभिनेता आणि प्रेक्षकही आपणच असतो. दिवाळीचा किल्ला एखादा विघ्नसंतोशी मुलाने लाथेने पाडून पळून जावे, तशी मला या संदर्भातील कोर्ट-कचेरी वाटत आहे. ही भातुकलीच असते, आनंदाने खेळावी..   

Story img Loader