अनेक वादांच्या वावटळी उडवत सुरु झालेल्या आणि संपलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फिरकलेच नाहीत. मुख्यमंत्री संमेलनाला जाणार नाही, असे समजताच अगदी संमेलनाच्या मांडवापर्यंत गेलेल्या काही काँग्रेसच्या मंत्र्यांनीही काढता पाय घेतल्याचे समजते. राज्यातील या साहित्योत्सवापासून जाणीवपूर्वक दूर राहून मुख्यमंत्र्यांनी संमेलनाला गराडा घालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिल्याचे मानले जात आहे.
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरुनच वादाला सुरुवात झाली. त्यानंतर चिपळूण मुक्कामी प्रत्यक्ष संमेलनाला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी मुख्य व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे व निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाचे चित्र छापल्यावरुन वादळ उठले. त्यातच साहित्य संमेलनाला राष्ट्रवादीचाच पूर्णपणे वेढा पडला होता. संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेल्या जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी तर या संमेलनावर आपले आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहील याची पुरेपूर काळजी घेतली. संमेलनासाठी फक्त राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व काही अपक्ष आमदारांचाच आमदार निधी घेतला गेला. काँग्रेसच्या एका आमदाराचे पत्र घेतले परंतु त्यांचा निधी मात्र घेतला नाही, असे समजते. संमेलनाच्या निमित्ताने काँग्रेस विरोधी राष्ट्रवादी, भाजप, सेना अशी नवी राजकीय जुळवाजुळव करण्याचचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. संमेलनाचे उद्घाटक केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते, त्यामुळे सारे संमेलन राष्ट्रवादीमय झाले होते. त्यामुळे पुढील राजकीय समीकरणांचा विचार करुन अशा संमेलनापासून दूर राहून राजकीय सावधगिरी बाळगणेच मुख्यमंत्र्यांनी पसंत केल्याचे सांगण्यात येते.  
संमेलनाचे ज्या दिवशी उद्घाटन झाले त्या दिवशी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री नारायण राणे कोकणातच सिंधुदुर्गमध्ये शिक्षक अधिवेशनाला हजर राहिले आणि मुंबईत परतले. संमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले होते, परंतु त्यांनी संमेलनापासून दूर राहणेच पसंत केले. त्याच दिवशी नारायण राणे सिंधुदुर्गातील सरपंच परिषदेतून भाषण आवरते घेताना, चिपळूणला साहित्य संमेलनाला जायचे आहे, असे सांगून टाकले, पण प्रत्यक्ष मात्र ते संमेलनाकडे फिरकलेच नाहीत. तर सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवताळे यांनी मराठी साहित्य संमेलन हा विषय माझ्या खात्याशी संबंधित नाही, तर मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या भाषा विभागाशी संबंधित आहे, अशी सबब सांगून संमेलनाला जाण्याचे टाळले. एक प्रकारे राष्ट्रवादीचा वेढा पडलेल्या या मराठी साहित्य संमेलनावर मुख्यंत्र्यांसह काँग्रेसच्या मंत्र्यांनीही अघोषित बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा