पहिल्या संमेलनापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आणि घटना दुरुस्तीला धर्मादाय आयुक्तांची मान्यता मिळालेली नसल्याने बेकायदा ठरलेले, ‘फुकट फौजदारां’चे विश्व मराठी साहित्य संमेलन यंदाही बारगळण्याची चिन्हे आहेत. लंडन येथील महाराष्ट्र मंडळाने हे संमेलन आयोजित करण्यास असमर्थता दर्शविल्याने साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आता नव्या निमंत्रकाच्या शोधात आहेत. गेल्या वर्षी साहित्य महामंडळ आणि निमंत्रक संस्थेच्या वादात टोरांटोचे विश्व मराठी साहित्य संमेलन रद्द झाले होते.
विश्व मराठी साहित्य संमेलन हा विषय महामंडळाने प्रतिष्ठेचा केला असल्याने गेली काही वर्षे हे संमेलन रेटून नेण्यात येत आहे. परदेशात होणाऱ्या या संमेलनासाठी महामंडळाचे पदाधिकारी आणि त्यांच्या सोयऱ्यांची वर्णी लागत असल्याने या संमेलनावर ‘फुकट फौजदारां’चे संमेलन म्हणून शिक्का बसला. विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळाने केलेली घटनादुरुस्ती धर्मादाय आयुक्तांकडून मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार या घटना दुरुस्तीला धर्मादाय आयुक्तांकडून मान्यता मिळेपर्यंत राज्य शासनाकडून यापुढे विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी या संमेलनासाठी लंडन येथील महाराष्ट्र मंडळाचे निमंत्रण आले होते. निमंत्रणाचा स्वीकार करून महामंडळाच्या मार्गदर्शन समितीच्या बैठकीत त्यावर चर्चाही झाली होती. मात्र यंदा संमेलनासाठी राज्य शासनाकडून २५ लाख रुपयांचे अनुदान मिळणार नाही, ही बाब काही जणांनी संमेलन आयोजकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी हे संमेलन घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे लंडन येथे हे संमेलन होणार नाही, हे नक्की झाल्याने महामंडळ आता नव्या निमंत्रकाच्या शोधात आहे.
दरम्यान साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, यंदाच्या वर्षी लंडन येथील महाराष्ट्र मंडळाकडून निमंत्रण प्राप्त झाले होते. मात्र त्यांनी हे संमेलन घेण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी लंडन नंतर आता अद्यापपर्यंत अन्य कोणाकडून निमंत्रण आलेले नाही. तसे निमंत्रण आले तर त्यावर नक्की विचार केला जाईल. महामंडळ आपणहून कोणाला संमेलन आयोजनासाठी विचारणा करत नाही, कोणाकडून निमंत्रण आले तर त्यावर चर्चा करून निर्णय घेते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा