विविध प्रकारच्या वादांमुळे गेले काही दिवस गाजत असलेले चिपळूण येथील ८६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर निर्वेधपणे पार पडण्याचे संकेत मिळू लागले आहेत. येत्या शुक्रवारपासून (११ जानेवारी) पवन तलाव मैदानावर होत असलेल्या या संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरील परशुराम आणि परशूचे चित्र, संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय, संमेलनासाठी शासकीय तिजोरीतून देण्यात आलेला अतिरिक्त निधी, पुरोगामी विचाराच्या हमीद दलवाई यांच्या घरापासून आयोजित करण्यात आलेली ग्रंथदिंडी, संमेलनाच्या सजावटीवरील खर्च इत्यादी विविध मुद्यांवरून गेले काही दिवस वादळ उठले होते. त्यापैकी काही मुद्यांवर संमेलनाच्या स्थानिक संयोजन समितीने समजूतदारपणा दाखवत तडजोडीची भूमिका स्वीकारली. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी आवश्यक तेथे पडद्यामागून सूत्रे हलवत विरोधाची धार बोथट केली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे इत्यादी मातब्बर राजकीय नेत्यांची संमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितीही या संदर्भात अप्रत्यक्षपणे प्रभावी ठरली आहे. त्यामुळे तांत्रिक-कायदेशीर बाबी वगळता संमेलन सुरळीतपणे पार पडेल, असे चित्र दिसत आहे.
दरम्यान हे संमेलन पर्यावरणस्नेही राखण्याचा संयोजकांनी सुरवातीपासून निर्धार केला आहे. त्याबाबतचा संदेश पोचवण्यासाठी उद्या (१० जानेवारी) सकाळी पर्यावरण दिंडी निघणार असून त्यानंतर या विषयावर दोन व्याख्याने होणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते परवा (११ जानेवारी) दुपारी ४ वाजता होणार आहे, तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण संमेलनाच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे आहेत. या व्यतिरिक्त विविध पक्षांचे मंत्री, खासदार, आमदार संमेलनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
ज्येष्ठ नेते कै. यशवंतराव चव्हाण यांचे नाव संमेलन परिसराला देण्यात आले असून मान्यवर साहित्यिकांची नावे मुख्य मंडपाच्या प्रवेशद्वारांना देण्यात आली आहेत. उद्घाटनानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन वगळता कोणताही कार्यक्रम वेळेअभावी होऊ शकणार नाही, हे लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी (१२ जानेवारी) दिवसभरात ८ कार्यक्रम आहेत. त्यात दोन परिसंवाद, खुल्या गप्पा, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ‘आमच्या रेषा बोलतात भाषा’ हा परिसंवाद आणि प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांचा ‘अमृताचा वसा’ हे कार्यक्रम होणार आहेत.

Story img Loader