मुंबईः अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद ऊर्फ विजय दास (३०) याला अटक केल्यानंतर आरोपीचे घटनास्थळावरून आरोपीच्या बोटांचे ठसे १९ ठिकाणी सापडले आहेत. जिना, खिडकी, सदनिका अशा विविध ठिकाणी हे ठसे सापडले असून आरोपीविरोधात हा भक्कम पुरावा ठरू शकतो. आरोपी ठाण्यात झुडपांमध्ये लपून बसला होता. तेथून त्याला ताब्यात घेऊन पुढे अटक करण्यात आली.
हल्ल्याच्या दिवशी आरोपी इमारतीत असलेल्या जिन्यावरून चढून आला व सैफचा धाकटा मुलगा जहांगीर याच्या खोलीतील शौचालयाच्या खिडकीतून घरात शिरला. त्यावेळी घरात शिरलेल्या अनोळखी व्यक्तीला पाहून सैफ अली खानच्या घरात काम करणारी महिला नर्स एरियामा फिलिप्स ऊर्फ लिमा या सैफचा मुलगा जहांगीर याला उचण्यासाठी धावल्या असता आरोपीने त्यांच्यावर हेक्सा ब्लेडसारख्या वस्तूने हल्ला केला. त्यावेळी सैफ अली खान व करीना दोघेही तेथे पोहोचले. त्यावेळी हल्लेखोराने हेक्सा ब्लेडसारख्या हत्याराने सैफवर हल्ला केला. तैमुरची आया लिमा यादेखील मध्ये पडल्या. आरोपींच्या हल्ल्यात त्याही जखमी झाल्या आहेत. ही घटना मध्यरात्री अडीच्या सुमारास घडली. सैफ यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थीर आहे.
हेही वाचा – सैफ हल्ला प्रकरण : मोबाइलद्वारे व्यवहार केल्याने आरोपीचा शोध
हल्यावेळी सैफच्या घरात पत्नी करीना कपूर, दोन मुलगे व तीन महिला कर्मचारी असे सात जण होते. सैफ अली खानचा मुलगा जहांगीरच्या खोलीत चोरटा शिरला. त्या खोलीत दोन महिला कर्मचारी झोपल्या होत्या. यातील एका महिला कर्मचाऱ्याला त्याने आधी शांत राहण्यास सांगून धमकावले. तसेच १ कोटी रुपये मागितले. त्यावेळी लिमा या सैफच्या लहान मुलाला घेण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. पण या सर्व झटापटीमध्ये आरोपीचे सैफच्या घरी १९ ठिकाणी उमटलेले बोटांचे ठसे तज्ज्ञांना सापडले आहेत. अंगुलीमुद्रा व न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या मदतीने महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.