मुंबईः अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद (३०) बांगलादेशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे याप्रकरणी पारपत्र कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पूर्वी ठाण्यातील हॉटेलमध्ये कामाला होता. आरोपीला ठाण्यातील कासारवडीवली पोलीस ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. तेथे आरोपी हिरानंदानी इस्टेट येथील झाडीमध्ये लपून पसला होता. अखेर त्याला ताब्यात घेऊन वांद्रे येथे आणण्यात आले आहे.
आरोपीला वांद्रे पोलिसांनी अटक केली असून त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखा, तसेच मुंबई पोलिसांच्या १०० जणांची विविध पथके तयार केली होती. आरोपी बेकायदेशीररित्या भारतात दाखल झाला असून त्याने विजय दास हे खोटे नाव सांगितले होते. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा – “धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणे हा मोठा अधर्म”, उद्धव ठाकरेंचा टोला
हेही वाचा – ठाणे, मुंबई शहरचे पालकत्व शिंदेंकडे
हल्ल्याच्या दिवशी आरोपी इमारतीत असलेल्या जिन्यावरून चढून आला व सैफचा धाकटा मुलगा जहांगिरच्या खोलीतील शौचालयाच्या खिडकीतून घरात शिरला. त्यावेळी घरात शिरलेल्या अनोळखी व्यक्तीला पाहून सैफ अली खानच्या घरात काम करणारी महिला नर्स एरियामा फिलिप्स ऊर्फ लिमा या सैफचा मुलगा जहांगीर याला उचण्यासाठी धावल्या असता आरोपीने त्यांच्यावर हेक्सा ब्लेडसारख्या वस्तूने हल्ला केला. त्यावेळी सैफ अली खान व करीना दोघेही तेथे पोहोचले. त्यावेळी हल्लेखोराने हेक्सा ब्लेडसारख्या हत्याराने सैफवर हल्ला केला. तैमुरची आया लिमा या देखील मध्ये पडल्या. आरोपींच्या हल्यात त्याही जखमी झाल्या आहेत. ही घटना मध्यरात्री अडीच्या सुमारास घडली. सैफ अली खानला एकूण सहा जखमा झाल्या आहेत. दोन गंभीर स्वरूपाच्या आहेत. प्रामुख्याने त्याच्या पाठीवर, एक मणक्याजवळ असलेली जखम गंभीर आहे. त्याच्या मानेवर एक किरकोळ जखम आहे, तर उर्वरित जखमाही किरकोळ स्वरूपाच्या आहेत. सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थीर आहे. हल्यावेळी सैफच्या घरात पत्नी करीना कपूर, दोन मुलगे व तीन महिला कर्मचारी असे सात जण होते. सैफ अली खानचा मुलगा जहांगीरच्या खोलीत चोरटा शिरला. त्या खोलीत दोन महिला कर्मचारी झोपल्या होत्या. त्यातील एका महिला कर्मचाऱ्याला त्याने आधी शांत राहण्यास सांगून धमकावले. तसेच १ कोटी रुपये मागितले. त्यावेळी लिमा या सैफच्या लहान मुलाला घेण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी सीसीटीव्हीतून आरोपीची ओळख पटली होती.