लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : अभिनेते सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद ऊर्फ विजय दासने (३०) सेन्चुरी मिल परिसरातील भुर्जी व पराठा विक्रेत्याकडून खाद्यपदार्थ खरेदी करून त्याला मोबाईलद्वारे पैसे पाठवले होते. त्याच व्यवहाराच्या माध्यमातून सैफवर हल्ला करणाऱ्या शरीफुल ऊर्फ दासचा मोबाइल क्रमांक मुंबई पोलिसांना सापडला. त्या क्रमांकाची आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना मदत झाली.

वांद्रे येथील सदनिकेत सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी बराच काळ वांद्रे परिसरात फिरत होता. त्यानंतर लकी जंक्शन येथून वांद्रे रेल्वे स्थानकावर तो गेला. तेथून त्याने लोकलद्वारे दादर स्थानक गाठले. त्यावेळी कबुतरखाना येथील मोबाइल वस्तूंच्या दुकानातून आरोपीने हेडफोन खरेदी केला. त्यावेळी आरोपी दासने रोख रक्कम दिली होती. सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा माग काढला असता आरोपी दास वरळी बावन्न चाळ परिसरातील सेंच्युरी मिल येथील एका टपरीवर बराच काळ दिसून आला. त्यावेळी आरोपी दोनवेळा त्या टपरीवाल्याशी बोलतानाही दिसून आला. त्यानंतर गुन्हे शाखेची पथके त्या परिसरात तैनात करण्यात आली. त्यांनी टपरीवाल्याची माहिती घेतली असता त्याचे नाव नवीन एक्का असल्याचे निष्पन्न झाले.

आणखी वाचा-Saif Ali Khan Stabbing Case: सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची बाजू मांडण्यासाठी भर कोर्टात दोन वकिलांमध्ये जुंपली

तसेच तो वरळी कोळीवाड्याच्या जवळील जनता कॉलनीत राहतो अशी माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी दास हा टपरीवाल्याचा मित्र असल्याच्या संशयावरून ७ पोलीस पथके वरळी कोळीवाडा परिसरात शनिवारी फिरत होती. वरळी कोळीवाडा बस थांब्याजवळील विक्रेत्यांना आरोपीचे छायाचित्र दाखवून त्याचा ठावठिकाणा पोलिस शोधत होते. त्यावेळी टपरीवाला नवीन एक्का हा जनता कॉलनी राहतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासणी केली असता घर बंद होते. शेजाऱ्यांना नवीन एक्का बाबत विचारले असता त्यांनी शेजारी कोण राहतो आम्हाला माहित नाही, पण हे घर राजनाराजयण प्रजापती यांचे असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना साांगितले. तसेच त्याचा मुलगा विनोद प्रजापती यांचा मोबाइल क्रमांक दिला. त्यावेळी पोलिसांना विनोद प्रजापती यांच्याकडून एक्काचा मोबाइल क्रमांक मिळाला.

आणखी वाचा-सैफ अली खान हल्ला प्रकरण : पबमध्ये कामाला असताना हल्लेखोराकडून हिऱ्याच्या अंगठीची चोरी

त्याबाबत विनोद प्रजापती यांना विचारले असता आरोपी त्यांच्या घरी वास्तव्याला नसल्याचे सांगितले. तसेच भुर्जी विक्रेत्याला घर भाड्याने दिले असून त्याच्या टपरीवर आरोपीने पराठा व पाण्याची बाटली घेतली. त्यावेळी मोबाइलद्वारे त्याने पैसे भरल्यामुळे आमच्या मार्फत पोलिसांना आरोपीचा मोबाइल क्रमांक मिळाला असे प्रजापती यांनी सांगितले. त्या घरातील दोघांनाही पोलिसांनी चौकशीला बोलावले होते. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. दरम्यान, त्याच मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचल्याचे कळते आहे.

Story img Loader