Saif Ali Khan Attack Case: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्या प्रकरणी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला आज सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुनावणीनंतर आरोपीच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधत असताना सुनावणी दरम्यान केलेल्या युक्तिवादाची माहिती दिली. ते म्हणाले, आरोपीला पुन्हा पोलीस कोठडी देण्याचे आज काहीच कारण नव्हते.
आरोपीचे वकील पुढे म्हणाले की, मी आरोपीशी आज बोललो, तो खूप घाबरलेला आहे. त्याला मी कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. सीसीटीव्ही चित्रणात दिसणारा व्यक्ती मी नाही. मला यात फसवले जात आहे, असा दावा आरोपीने केला आहे. तसेच वकील पुढे म्हणाले की, पोलिसांनी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही. आरोपीनेच गुन्हा केला, हे सिद्ध झालेले नाही. तसेच माध्यमात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा चेहऱ्यात साम्य दिसलेले नाही.
सैफ अली खानने पोलिसांना फोन का नाही केला?
आरोपीला अटक करताना त्याला कुठलीही माहिती दिली गेलेली नाही. त्याला थेट उचलून आणले आहे. तसेच त्याच्या कुटुंबियांनाही माहिती दिलेली नाही, असे वकिलांनी म्हटले. तसेच वकिलांनी या संपूर्ण प्रकरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १२ मजल्याच्या इमारतीमध्ये फक्त पायऱ्यांवर सीसीटीव्ही आहे. तसेच हल्ला झाल्यानंतर करीन कपूर घरात असतानाही त्या सैफ अली खानबरोबर रुग्णालयात गेल्या नाहीत. तसेच सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतरही त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्याला फोन केला नाही किंवा पोलिसांनाही फोन केला नाही.
आरोपी बांगलादेशमधून भारतात कसा आला?
सैफवर हल्ला करणार आरोपी शरिफुल ऊर्फ दास हा बांगलादेशी घुसखोर असून त्याने मे महिन्यात बांगलादेश सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केला होता. मेघालयात प्रवेश केल्यानंतर त्याने एका दलालाला दहा हजार दिले. त्या दलालाने त्याला आसामपर्यंत आणले आणि त्याला एक सिम कार्डही उपलब्ध केले. त्याच दलालाने त्याला कोलकात्याला जाण्याऱ्या बसमध्ये बसवून दिले. कोलकात्यात तीन दिवस राहिल्यानंतर आरोपीने मुंबईत जाण्यासाठी रेल्वे पकडली. मुंबईत त्याने पुढील तीन दिवस इकडे तिकडे भटकून काढले. त्यानंतर त्याची ओळख जितेंद्र पांडे याच्याशी झाली. पांडे याने त्याला वरळीतील एका पबमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून नोकरी लावली. मात्र गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात काही दिवसातच चोरीच्या आरोपाखाली त्याला काढून टाकण्यात आले.