मुंबई : अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद ऊर्फ विजय दास(३०) गेल्यावर्षी वरळी कोळीवाड्यातील पबमध्ये कामाला होता. त्यावेळीही त्याने एका ग्राहकाची हिऱ्याची अंगठी चोरली होती. याप्रकरणात आरोपी शरीफुल उर्फ दासचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात त्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती या प्रकरणाशी संबंधीत व्यक्तीने दिली.
सैफ अली खानवर हल्ला करणारा शरीफुल उर्फ दास गेल्यावर्षी मुंबईतही वास्तव्याला होता. त्यावेळी आरोपी वरळी कोळीवाड्यातील एका पबमध्ये काम करत होता. शरिफुल थोडा विक्षीप्त होता, बोलायला चांगला होता. तो हाऊस किपिंगमध्ये काम करायचा. त्याच्या कामाबाबत काहीच प्रश्न नव्हता. पण ऑगस्ट २०२४ ला पबमध्ये आलेल्या एका ग्राहकाची हिऱ्याची अंगठी चोरीला गेली होती. त्या ग्राहकाने पबच्या व्यवस्थापनाला माहिती देऊन नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तातडीने तपासणी करण्यात आली. आरोपी दासने अंगठी चोरल्याचे समजले उघडकीस आले. त्यानंतर तात्काळ त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते.
आणखी वाचा-एसटी निविदेत घोटाळा उघड, पुन्हा प्रक्रियेची समितीकडून शिफारस; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
एका कंत्राटदारामार्फत त्याला पबमध्ये नोकरी देण्यात आली होती. त्यामुळे कंत्राटदारासह सहा जणांना पोलिसांनी त्यावेळी चौकशीसाठी बोलावले होते. त्या सर्वांची चौकशी केल्यानंतर घरी पाठवण्यात आले होते. पण त्यावेळी आरोपी बांगलादेशी आहे याची कल्पना नव्हती. त्यानेही तसे कोणालाही सांगितले नसल्याचे त्याच्यासह काम केलेल्या पबमधील एका कर्मचाऱ्याने सांगितले. आता टीव्हीवरील बातम्यांमध्ये आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे समजले. यावेळी आरोपीने नोकरीसाठी कोणती कागदपत्रे जमा केली होती. याबाबत विचारले असता आरोपी कंत्राटदारामार्फत नोकरीला लागला होता. त्यामुळे कंत्राटदाराकडे त्याने कागदपत्र जमा केली होती. त्याबाबत अधिक माहिती नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले.
आणखी वाचा-मुख्यमंत्री स्वित्झर्लंडमध्ये दाखल, झुरिच येथे पारंपरिक पद्धतीने स्वागत
आरोपी खूप कमी कालावधीसाठी पबमध्ये कामाला होता. त्यामुळे त्याच्याबद्दल फार माहिती नाही. पण त्याने चोरी केल्यामुळे कामावरून काढले होते. ही घटना गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात घडली होती. पण ग्राहकाने त्याबाबत पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. त्यामुळे त्यावेळी दासवर गुन्हा दाखल झाला नसल्याचे पबमध्ये काम करणाऱ्या एकाने सांगितले. पण तो स्वतःचे गाव आणि कुटुंबियांबद्दल बोलणे टाळायचा, अशीही माहिती एकाने दिली. आरोपी कंत्राटदाराकडून एक हजार रुपये घेण्यासाठी वरळीत आला होता, अशीही चर्चा आहे. पण त्याला कोणीही अधिकृत दुजोरा दिला नाही.