मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरात घुसून त्याच्यावर चाकूने वार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला बांगलादेशी नागरिक आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. तसेच, त्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला आहे.

आपल्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा देखील शरीफुल याने जामिनाची मागणी करताना केला आहे. अटकेची कारवाई करताना त्याची कारणे आरोपीला सांगणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, पोलिसांनी आपल्याला अटक करताना त्याची कारणेच सांगितली नाहीत. त्यामुळे, आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचेही शरीफुल याने अर्जात म्हटले आहे. त्याच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.

गेल्या १६ जानेवारी रोजी सैफ याच्या वांद्रे येथील घरामध्ये शरीफुल हा चोरीच्या उद्देशाने घुसला होता आणि त्याने सैफ याच्यावर चाकूने अनेक वार केले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. दुसरीकडे, हल्ल्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी शरीफुल याला अटक केली होती. परंतु, आपल्याला या प्रकरणी गोवण्यात आले आहे. मूळात पोलिसांनी अटक करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन केलेले नाही. त्यामुळे, आपल्याला केलेली अटक बेकायदा असल्याचा दावा शरीफुल याने अर्जात केला आहे. त्याचप्रमाणे, या प्रकरणातील साक्षीदारांचे म्हणणे सत्य मानले तरी पोलिसांनी त्यांचे म्हणणे सिद्ध करणारे पुरावेच सादर केलेले नाहीत, असा दावा देखील शरीफुल याने अर्जात केला आहे.

म्हणून आपण जामिनास पात्र

प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला असून केवळ आरोपपत्र दाखल करणे प्रलंबित आहे. याशिवाय, पोलिसांच्या तपासात आपण सर्वतोपरी सहकार्य केले आहे. परंतु, आपल्याला आता आणखी कोठडीत ठेवून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे आपली जामिनावर सुटका करावी, अशी मागणी शरीफुल याने केली आहे. शरीफुल याच्या अटकेच्या वेळी त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला चुकून अटक केल्याचा दावा केला होता. सेफ याच्या इमारतीतील सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसणारा आरोपी हा त्यांचा मुलगा नसल्याचा दावाही शरीफुल याच्या वडिलांनी केला होता. तथापि, फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाद्वारे शरीफुल याची ओळख पटवण्यात आली होती, असा दावा करून त्याच्या वडिलांच्या दाव्याचे पोलिसांनी खंडन केले होते.