मुंबईः पोलिसांपासून वाचण्यासाठी झुडपात लपून बसलेल्या सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम (३०) पोलिसांनी पकडल्यावर घाबरला होता. चौकशी दरम्यान त्याने गुन्हा कबूल केला आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तयार केलेल्या शंभर पोलिसांच्या पथकात हा अधिकारी सहभागी होता.
इस्लामने गुरुवारी पहाटे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर सुमारे ७० तासांनी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. त्यासाठी शंभर पोलीस कार्यरत होते. पोलिस जवळ पोहोचत आहेत याची जाणीव होताच हल्लेखोर घाबरला आणि झाडाझुडपांत लपला. परंतु शेवटी त्याला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी विचारले असता सैफवर हल्ला केल्याचे त्याने कबुल केले. सध्या त्याची खार पोलिस ठाण्यात चौकशी सुरू असून दुपारी त्याला वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपी काही काळ तुरुंगात होता, अशी माहितीही पोलिसांना मिळाली आहे. चोरीच्या प्रकरणात तो किती काळ कारागृहात होता, ही माहिती पोलीस तपासत आहेत.
हेही वाचा – धारावीत बॉम्ब असल्याचा निनावी दूरध्वनी
हेही वाचा – सैफच्या हल्लेखोराला पकडायला किती पोलीस कामाला?
आरोपीला ठाण्यातील कासारवडीवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रविवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. तेथे आरोपी हिरानंदानी इस्टेट येथील झाडीत लपून पसला होता. अखेर त्याला ताब्यात घेऊन वांद्रे येथे आणण्यात आले. त्याला सुरूवातीला चेंबूर पोलीस ठाण्यात व त्यानंतर खार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. त्याला वैद्यकीय चाचणीनंतर न्यायालयापुढे हजर करण्यात येईल असे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी वांद्रे पोलीस याप्रकरणी पुढील तपास करणार आहेत. ते आरोपीच्या कोठडीसाठी न्यायालयापुढे मागणी करतील. दरम्यान आरोपी शहजाद हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. बांगला देशातून मुंबईत तो आला होता. मुंबईत त्याच्यासोबत राहणाऱ्या दोघांची शनिवारी गुन्हे शाखेने चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपी मुंबईत हाऊस किंपींग एजन्सीमध्ये कामाला होता. आरोपीकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे त्याच्याविरोधात पारपत्र कायदा व परकीय नागरिक कायद्याअंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली आहे. आरोपी पूर्वी ठाण्यातील हॉटेलमध्ये कामाला होता.