मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम याने जामिनासाठी केलेल्या अर्जाला मुंबई पोलिसांनी शुक्रवारी विरोध केला. तसेच, सैफ याच्या मणक्यात अडकलेला चाकूचा तुकडा आणि घटनास्थळी सापडलेला तुकडा हे शरीफुल याच्याकडून हस्तगत केलेल्या शस्त्राशी जुळत आहेत. किंबहुना हे तिन्ही तुकडे एकाच चाकूचा भाग होते, असा दावाही पोलिसांनी केला.
चाकूचे तिन्ही तुकडे कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत रासायनिक विश्लेषण तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालाचा दाखला पोलिसांनी शरीफुल याच्या जामीन अर्जाला विरोध करताना दिला. तसेच, हा अहवाल आरोपीविरोधातील ठोस पुरावा असल्याचा दावाही पोलिसांनी केला. या अहवालानुसार, हे तिन्ही तुकडे एकाच चाकूचे भाग असल्याचे म्हटले आहे. या अहवालाच्या आधारेच शरीफुल याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले जाईल, असेही पोलिसांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.
जामीन दिल्यास पुन्हा गुन्हे करण्याची शक्यता
शरीफुल याच्यावर दाखल गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असून आरोपीविरुद्ध ठोस पुरावे आहेत. तसेच, आरोपी हा भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करत होता. त्यामुळे, त्याला जामीन मंजूर केल्यास तो फरार होण्याची शक्यता आहे. तसेच, जामिनावर सुटका झाल्यास त्याच्याकडून तक्रारदार आणि साक्षीदारांना धमकावले जाऊ शकते. शिवाय, भविष्यात तो अशा प्रकारचे गुन्हे वारंवार करत राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असा दावा देखील पोलिसांनी शरीफुल याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी करताना केला.
शरीफुलचा दावा
आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा खोटा असून आपली अटकही बेकायदेशीर आहे, असा दावा शरीफुल याने जामिनाची मागणी करताना आहे. अटक करता त्याची कारणे पोलिसांनी आपल्याला सांगणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, पोलिसांनी आपल्याला अटकेची कारणे सांगितलेली नाहीत. त्यामुळे, आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचा दावा शरीफुल याने अर्जात केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आवश्यक ते पुरावे गोळा केले असून तपास जवळजवळ पूर्ण झाला आहे. आता केवळ आरोपपत्र दाखल करणे शिल्लक आहे. शिवाय, आपण तपासात पोलिसांना सहकार्य केले आहे. त्यामुळे, आपल्याला आणखी कोठडीत ठेवून कोणताही हेतू साध्य होणार नाही, असा दावा देखील शरीफुल याने अर्जात केला आहे.