मुंबई : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी सीसीटीव्हीतील संशयीताचा चेहरा व अटक आरोपीचा चेहरा यांचा पडताळणी अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. न्यायावैद्यक अहवालानुसार आरोपीचे छायाचित्र व सीसीटीव्हीतील व्यक्तीचा चेहरा एकाच व्यक्तीचा असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी आरोपी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम (३०) विरोधात पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपी १६ जानेवारी रोजी इमारतीमधील जिन्यावरून चढून वर आला आणि सैफचा धाकटा मुलगा जहांगीरच्या खोलीतील शौचालयाच्या खिडकीतून घरात शिरला. घरात शिरलेल्या अनोळखी व्यक्तीला पाहून सैफ अली खानच्या घरात काम करणारी महिला नर्स एरियामा फिलिप्स ऊर्फ लिमा जहांगीरला उचण्यासाठी धावल्या. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्याचवेळी सैफ अली खान आणि करिना दोघेही तेथे पोहोचले. हल्लेखोराने चाकूने सैफवर हल्ला केला. तैमुरची आया गीता मध्ये पडल्या. आरोपीने केलेल्या हल्ल्यात त्याही जखमी झाल्या. आरोपीला १९ जानेवारी रोजी ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून अटक करण्यात आली होती.

सैफच्या इमारतीमधील सीसीटीव्हीत हल्ल्याच्या दिवशी आरोपीचे चित्रीकरण झाले होते. याप्रकरणी आरोपीचा चेहरा व अटक आरोपीचा चेहरा यात तफावत असल्याचे आरोप करण्यात येत होते. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या मदतीने आरोपीची फेस रेकगनाझेशन चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत सीसीटीव्हीतील आरोपीचा चेहरा व अटक आरोपीचे छायाचित्र यांची तंत्रज्ञानाच्या मदतीने पडताळणी करण्यात आली. त्यात दोन्ही व्यक्ती एकच असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan attack case police received face verification report of accused report of forensic lab mumbai print news ssb