Saif Ali Khan Attack Case Update News : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या मध्यरात्री राहत्या घरी चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर सैफ अली खानला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केलं आहे.
सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर आज आरोपी मोहम्मद शेहजादला मुंबईतील वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने आरोपी मोहम्मद शेहजाद याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल न्यायालयाने सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात वेगवेगळा संशय व्यक्त केला. आरोपीकडे भारतातील कोणतेही वैध भारतीय कागदपत्र नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच तो बांगालादेशमधून बेकायदेशीरपणे भारतात आल्याचा संशय आहे. याबाबत आता पोलिसांच्या तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.
आरोपीचे वकील काय म्हणाले?
न्यायालयातील सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं? याविषयीची माहिती आरोपी मोहम्मद शेहजाद याची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, “न्यायालयाने पाच दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी मोहम्मद शेहजाद याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच आरोपी बांगलादेशी आहे हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. तसेच या प्रकरणात कोणताही आंतरराष्ट्रीय संबंध नाही. आरोपी शहजाद हा सात वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून मुंबईत राहत आहे. मात्र, मोहम्मद शेहजाद हा आधी बांगलादेशमध्ये राहत होता. आता तो मुंबईत राहत आहे. या संपूर्ण प्रकरणात कोणताही आंतरराष्ट्रीय मुद्दा दिसत नाही”,असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं आहे.
Saif Ali Khan Attack case | Accused Mohammad Shariful Islam Shehzad was produced in Bandra Holiday Court in Mumbai. The Court has granted his 5-day police custody. pic.twitter.com/fshe7cqH4X
— ANI (@ANI) January 19, 2025
बांगलादेशी घुसखोर असल्याचा आरोप
सैफ अली खानवर चाकूहल्ला करणारा आरोपी शहजाद हा बांगलादेशी घुसखोर असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बांगलादेशातून मुंबईत आला आणि मुंबईत हाऊस किंपींग एजन्सीमध्ये कामाला होता,असे वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र, अधिक माहिती आता पोलीस तपासानंतर समोर येणार आहे.
नेमकं काय घडलं होतं?
१६ जानेवारीच्या मध्यरात्री २ ते २:३० च्या सुमारास सैफ अली खानच्या राहत्या घराच्या ११ व्या मजल्यावर दरोडेखोर शिरला. यावेळी सैफने आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी या हल्लेखोराचा सामना केला. सैफवर चाकूने सहा वार करण्यात आले. याशिवाय अभिनेत्याच्या घरातील मदतनीस सुद्धा यात जखमी झाली होती. रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या मते, सैफची प्रकृती स्थिर असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही.