Saif Ali Khan Attacker Claims false case against him : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने मुंबई सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली असून यामध्ये त्याने म्हटलं आहे की त्याने कुठलाही अपराध केलेला नाही. इस्लाम शहजादने जामीन अर्ज दाखल करत म्हटलं आहे की “माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मला या गुन्ह्यात अडकवण्यासाठी कट रचला गेला आहे.” इस्लाम शहजादचे वकील न्यायालयात म्हणाले, “माझ्या आशिलाविरोधातील खटला पूर्णपणे खोटा आहे. त्याने कुठलाही गुन्हा केलेला नाही. तसेच तो कुठल्याही गुन्ह्यात सहभागी देखील नाही.”

शरीफुल इस्लाम शहजादचे वकील म्हणाले, “माझ्या आशिलाने आतापर्यंत पोलिसांना पूर्ण सहकार्य केलं आहे. तपास पथकाने घटनास्थळ व आसपासचं सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतलं आहे. तसेच आरोपीचे कॉल रेकॉर्डिंग्स मिळवले आहेत. त्यामुळे आरोपीने कुठल्याही पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.” इस्लामवर आरोप आहे की तो १६ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसला होता. त्याने सैफ अली खान व त्यांच्या घरात काम करणारी महिला गीता हिच्यावर हल्ला केला. त्याने काठी व ब्लेडने हल्ला केला होता. त्याच्या हल्ल्यात सैफ अली खान गंभीररित्या जखमी झाला होता.

शरीफुल इस्लामने जामीन अर्जात काय म्हटलंय?

शरीफुल इस्लामने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला काही शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. दरम्यान, जामीन अर्जात शरीफुल इस्लामने म्हटलं आहे की न्यायालयाने शिक्षा सुनावण्याआधी अशा प्रकारच्या कोठडीत ठेवून शिक्षा देणं चुकीचं आहे. वांद्रे पोलिसांनी आतापर्यंत या खटल्यात दोषारोपपत्र दाखल केलेलं नाही. मुंबई सत्र न्यायालय लवकरच इस्लामच्या जामीन अर्जावर सुनावणी करू शकतं.

आरोपीकडे बांगलादेशी ओळखपत्र व चालक परवाना

शरीफुल इस्लामकडे पोलिसांना बांगलादेशी ओळखपत्र व वाहन चालक परवाना सापडला होता. विजय दास या नावाने तो अवैधरित्या मुंबईत राहत होता. तो मूळचा बांगलादेशमधील बरिशाल शहरातील रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं होतं. सैफ अली खानवर हल्ला करण्यापूर्वी तो पाच महिन्यांपासून मुंबईत राहत होता. तसेच एका ठिकाणी साफसफाईचं काम करत होता.