Saif Ali Khan Attacker : अभिनेता सैफ अली खान याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात घुसून त्याच्यावर हल्ला केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. सैफच्या घरात घुसलेला या बांगलादेशी आरोपीला बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळवण्यासाठी ३० हजार रुपये चोरायचे होते अशी माहिती मुंबई पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यांने पोलिसांना सांगितले की तो फक्त भारतीय पासपोर्ट मिळवण्याच्या उद्देशाने भारतात आला होता. त्याने सांगितले की, बांगलादेशी नागरिकांच्या तुलनेत भारतीय नागरिक म्हणून परदेशातील वर्क व्हिसा मिळवणे सोपे जाते. त्याला आधी आधार आणि पॅन कार्ड मिळवायचे होते आणि त्यानंतर तो पासपोर्टसाठी अर्ज करणार होता.

१६ जानेवारी रोजी वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरात दरोड्याच्या प्रयत्नात झाला होता, यावेळी सैफ अली खान हा गंभीर जखमी झाला होता. जखमांमधून रक्त वाहत असताना त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ५ दिवसांनी त्याला घरी सोडण्यात आले. या प्रकरणी हाल्ल्याच्या तीन दिवसांनंतर पोलिसांनी ठाणे येथून शहजाद याला अटक करण्यात आले.

शहजाद याने पोलिसांना सांगितले की तो बांगलादेशातील झालकाठी जिल्ह्यातील रहिवासी असून सैफवर हल्ला झाला त्याच्या आठ महिन्यांपूर्वी तो बेकायदेशीर पद्धतीने भारतात आला होता. तो १५ दिवस कोलकाता येथे राहिला त्यानंतर गितांजली एक्सप्रेसने प्रवास करून तो मुंबईला आला.

तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करू लागला आणि १५ जानेवारीच्या दिवशी त्याने सुट्टी घेतली. “मला बरे वाटत नव्हतं आणि मला पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवून घ्यायचे होते,” असे त्याने सांगितले. यासह त्याने आपण कोणाशीतरी बोलला आहोत ज्याने बनावट कागदपत्रांसाठी ३० हजार रूपयांची मागणी केली, असेही सांगितले होते. शहजादने पोलिसांना सांगितले की त्याने कागदपत्रे बनवण्यासाठी लहानशी चोरी करण्याची योजना आखली होती.

त्या रात्री नेमकं काय झालं?

शहजाद याने पोलिसांना सांगितलं की, तो सैफ अली खान राहतो त्या इमारतीला लागून असलेल्या इमारतीच्या छतावर गेला. तेथून त्याने सैफच्या इमारतीच्या परिसरात उडी मारली. त्यानंतर इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या पायऱ्यांवरून तो वर गेला, तेथे त्याला सुरक्षा जाळी आढळली. त्यानंतर त्याने कटर वापरून एअर कंडिशनिंग डक्टमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर तो बाथरूममधून सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला.

जेव्हा तो घरात शिरला तेव्हा घाबरलेल्या आयाने त्याला काय हवे आहे असे विचारले. शहजादने १ कोटी रुपयांची मागणी केली. यावेळी सैफ अली खानने खोलीत प्रवेश केला आणि त्याला पकडले. “मी पळून जाण्यासाठी त्याच्यावर चाकूने वार केले. त्याच्या पाठीवर आणि हातावर वार केले. नंतर त्याची पकड सैल झाली. त्याने मला खोलीत ढकलले आणि दार बंद केले. पण मी खिडकीतून पळून गेलो आणि पाईप वरून खाली उतरलो. मी खाली कपडे बदलले आणि बस स्टॉपवर पळून गेलो आणि तिथेच झोपलो. नंतर मी वांद्रे स्टेशनला गेलो,” असे शहजादने सांगितल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.