मुंबईः अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास (३०) याला पोलिसांनी वांद्रे येथे घटनास्थळी नेऊन तपास केला. त्यावेळी सैफच्या सदनिकेत नेऊन आरोपीने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यात आली. आरोपी बांगलादेशी घुसखोर असून सात महिन्यांपूर्वी भारतात आला होता.
आरोपीला सैफच्या घरी नेऊन सर्व घटनाक्रमाची माहिती घेण्यात आली. आरोपीने चौकशीत दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यात आली. ठाण्यातून अटक करण्यात आलेला आरोपी शरिफुल ऊर्फ दास हा बांगलादेशात बारावीपर्यंत शिकला आहे. सात महिन्यांपूर्वी भारतात घुसखोरी करताना त्याने कोणाचीही मदत घेतली नाही. तो स्वतः तेथील डावकी नदीतून २०० मीटर पोहून भारतात दाखल झाला. भारतात आल्यावर विजय दास नाव सांगू लागला. कोलकात्यामध्ये तो काही काळ वास्तव्याला होता. त्यावेळी त्याने कोलकात्यातील एका व्यक्तीच्या नावाने मोबाइल सीमकार्ड खरेदी केले. ते सीमकार्ड खुकूमोनी जहांगीर सेख नावावर आहे. त्या सीमकार्डचा वापर करून आरोपीने आणखी सीमकार्ड खरेदी केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलीस या माहितीची पडताळणी करत आहेत. कोलकात्यावरून तो नोकरीसाठी मुंबईत आला. त्यावेळी कंत्राटदार अमित पांडे यांच्या माध्यमातून वरळी व ठाण्यातील हॉटेलमध्ये त्याला नोकरी मिळाली.
हेही वाचा – भांडुपमधील ड्रीम मॉलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
हेही वाचा – तानसा जलवहिनीला गळती, दादर, सांताक्रुझ, अंधेरीसह भांडुपमधील पाणीपुरवठा खंडित
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याला कोलकात्याबाबत विचारले असता त्याला उत्तर देता आले नाही. त्यावेळी त्याला विचारले असता त्याने आपण बांगलादेशी नागरिक असल्याचे मान्य केले. त्याच्या मोबाइलमध्ये काही अॅप्लिकेशन सापडली आहेत. त्याद्वारे आरोपी बांगलादेशातील कुटुंबियांशी संपर्क साधायचा. त्यावरून पोलिसांनी त्याच्या भावाशी संपर्क साधून त्याच्या जन्माचा दाखला मागवून घेतला असून त्यावरून तो बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले, असे सूत्रांनी सांगितले.