मुंबईः अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद (३०) ऊर्फ विजय दास काही काळ वरळी कोळीवाड्याच्या शेजारी असलेल्या जनता कॉलनी परिसरात वास्तव्याला होता, अशी माहिती समजली आहे. आरोपी आणखी दोघाजणांसह तेथे भाडेतत्त्वावर राहत होता. आरोपी शहजादसह राहणाऱ्या दोन व्यक्तींची गुन्हे शाखेने चौकशी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आरोपी शहजाद हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. बांगलादेशातून मुंबईत तो आला होता. काहीकाळ मुंबईतील वरळी कोळीवाड्या शेजारी असलेल्या जनता कॉलनी येथे वास्तव्याला होता, अशी माहिती समजली आहे. माहितीची पडताळणी करण्यात येत आहे. याप्रकरणी त्याच्यासोबत राहणाऱ्या दोघांची शनिवारी गुन्हे शाखेने चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा – Saif Ali Khan : सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर
आरोपी मुंबईत हाऊस किंपींग एजन्सीमध्ये कामाला होता. त्याच्या शोधासाठी पोलीस पथक जनता कॉलनी परिसरातही आले होते. आरोपीकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे त्याच्याविरोधात पारपत्र कायदा व परकीय नागरिक कायद्याअंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली आहे. आरोपी पूर्वी ठाण्यातील हॉटेलमध्ये कामाला होता. आरोपीला ठाण्यातील कासारवडीवली पोलीस ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. तेथे आरोपी हिरानंदानी इस्टेट येथील झाडीमध्ये लपून बसला होता. अखेर त्याला ताब्यात घेऊन वांद्रे येथे आणण्यात आले आहे. त्याला सुरुवातीला चेंबूर पोलीस ठाण्यात व त्यानंतर खार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. आरोपीला सैफ हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अटक केली असून त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखा, तसेच मुंबई पोलिसांच्या १०० जणांची विविध पथके तयार केली होती. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा – “धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणे हा मोठा अधर्म”, उद्धव ठाकरेंचा टोला
हल्ल्याच्या दिवशी आरोपी इमारतीत असलेल्या जिन्यावरून चढून आला व सैफचा धाकटा मुलगा जहांगीरच्या खोलीतील शौचालयाच्या खिडकीतून घरात शिरला. त्यावेळी घरात शिरलेल्या अनोळखी व्यक्तीला पाहून सैफ अली खानच्या घरात काम करणारी महिला नर्स एरियामा फिलिप्स ऊर्फ लिमा या सैफचा मुलगा जहांगीर याला उचण्यासाठी धावल्या असता आरोपीने त्यांच्यावर हेक्सा ब्लेडसारख्या वस्तूने हल्ला केला. त्यावेळी सैफ अली खान व करीना दोघेही तेथे पोहोचले. त्यावेळी हल्लेखोराने हेक्सा ब्लेडसारख्या हत्याराने सैफवर हल्ला केला होता. त्यावेळी तैमुर यांची आया गिता यादेखील मध्ये आल्यामुळे त्याही हल्ल्यात जखमी झाल्या होत्या.