मुंबईः अभिनेता सैफ अली खानवर चोरट्याने चाकू हल्ला केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सैफ व त्याची पत्नी करिना दोघांनाही मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. याशिवाय सैफ राहत असलेल्या इमारतीची खासगी सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीने सैफवर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या चाकूचे दोन तुकडे पोलिसांनी जप्त केले असून तिसऱ्या तुकड्याचा सध्या शोध सुरू आहे. त्यासाठी वांद्रे तलाव परिसरात पोलिसांनी शोध मोहिम राबवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सैफ व करीना यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी एक पोलीस शिपाई तैनात करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेऊन त्यांना सुरक्षा पुरवण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या इमारतीतील खासगी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. इमारतीत अद्यावत सुरक्षा प्रणाली बसवण्यात आली असून सीसीटीव्हीही बसवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>>गोराई आगारातील बसने तरुणाला चिरडले,भाडेतत्वावरील बस अपघातांच्या घटनांचे सत्र सुरुच

इमारतीतील काही सीसीटीव्ही कॅमेरे हल्ल्याच्या वेळी होते बंद होते. तसेच डीव्हीआरचा युजरनेम आणि पासवर्ड तात्काळ उपलब्ध न झाल्याने सीसीटीव्हीचे चित्रिकरण मिळण्यास वेळ गेला. त्यामुळे त्या यंत्रणेतही सुधारणा करण्यात आली. दरम्यान, सैफ अली खानने त्यांना रुग्णालयात नेणारा रिक्षा चालक भजन सिंह याची मंगळवारी भेट घेतली. यावेळी सैफने भजन सिंहचे आभार मानून भविष्यात कोणतीही अडचण आल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले, असे सूत्रांनी सांगितले.

सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास (३०) याने वापरलेला चाकूचा तिसरा तुकडा शोधण्यासाठी पोलिसांनी बुधवारी शोध मोहिम राबवली. चाकूचा एक तुकडा सैफच्या शरीरातून शस्त्रक्रिया करताना सापडला होता. दुसरा तुकडा सैफच्या वांद्रे येथील घरातून पोलिसांनी जप्त केला आहे. तिसरा तुकडा आरोपीने फेकून दिल्याचा संशय असून त्यासाठी बुधवारी वांद्रे येथील तलाव परिसरात पोलिसांनी शोध मोहिम राबवली.

हेही वाचा >>>वृद्धापकाळातील आरोग्य सेवा गतिमान करणार! वर्षभरात साडेदहा लाख वृद्धांवर उपचार…

सैफवर हल्ला करणार आरोपी शरिफुल ऊर्फ दास हा बांगला देशी घुसखोर असून त्याने मे महिन्यात बांगलादेश सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केला होता. मेघालयात प्रवेश केल्यानंतर त्याने एका दलालाला दहा हजार दिले. त्या दलालाने त्याला आसामपर्यंत आणले आणि त्याला एक सिम कार्ड देखील पुरवले. त्याच दलालाने त्याला कोलकात्याला जाण्यासाठी बसमध्ये बसवून दिले. कोलकात्यात तीन दिवस राहिल्यानंतर आरोपीने मुंबईत येण्यासाठी रेल्वे पकडली. मुंबईत त्याने पुढील तीन दिवस इकडे तिकडे भटकून काढले. त्यानंतर त्याची ओळख जितेंद्र पांडे यांच्याशी झाली. पांडे याने त्याला वरळीतील एका पब मध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून नोकरी लावली. मात्र गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात काही दिवसातच चोरीच्या आरोपाखाली त्याला काढून टाकण्यात आले. दुसरी नोकरी गमावल्यानंतर शरीफुलने चोऱ्या करण्यास सुरूवात केली असून ३१ डिसेंबर पासून शरीफ खार आणि वांद्रे सारख्या उच्चभ्रू परिसरात फिरून आपले लक्ष्य शोधत होता. घरफोडी करण्यासाठी त्याने स्क्रू-ड्रायव्हर, हातोडा आणि हॅक्सॉ ब्लेड घेतले. ठाण्याच्या रेस्टॉरंटमधून चोरलेला चाकूही शरिफुल जवळ बाळगत होता, अशी माहिती चौकशीत मिळाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan private security increased after attack mumbai print news amy