Saif Ali Khan Stabbing Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या मध्यरात्री राहत्या घरी चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना घडली. तब्बल तीन दिवस पोलीसांची अनेक पथके आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर रविवारी (दि. १९ जानेवारी) सकाळी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद (३०) ऊर्फ विजय दास याला अटक करण्यात आली. आरोपीकडे भारतातील कोणतेही वैध भारतीय कागदपत्र नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच तो बांगालादेशमधून बेकायदेशीरपणे भारतात आल्याचा संशय आहे. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर वांद्रे सत्र न्यायालयात वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला. आरोपीची बाजू मांडण्यासाठी दोन वकील आपापसात भिडले. अखेर न्यायालयाला या वादात मध्यस्थी करावी लागली.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी आरोपी शरीफुल इस्लाम शहजादला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने नकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर त्याला आरोपीसाठी असलेल्या जागेवर उभे राहण्यास सांगितले.
सुनावणी सुरू झाल्यानंतर शहजादची बाजू मांडण्यासाठी एक वकील पुढे आले. हे वकील आरोपीचा वकालनामावर स्वाक्षरी घेण्यासाठी पुढे आल्यानंतर आणखी वकिलाने आरोपीची बाजू मांडत असल्याचा दावा केला. तसेच त्यानेही वकालतनामावर स्वाक्षरी मिळविण्यासाठी धाव घेतली. आरोपी उभा असलेल्या जागी दोन वकिलांमध्ये वकालतनामावर स्वाक्षरी घेण्यासाठी धक्काबुक्की झाली. यामुळे आरोपीची बाजू नेमकी कोण मांडणार? यावरुन गोंधळ निर्माण झाला.
दरम्यान या गोंधळात न्यायालयाने हस्तक्षेप केला. सत्र न्यायालयाच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे आरोपीची बाजू मांडण्याचा सल्ला दोन्ही वकिलांना दिला. न्यायदंडाधिकाऱ्यांचा हा सल्ला दोन्ही वकिलांनी मानला आणि त्यानंतर सुनावणी सुरू झाली.
आरोपीचे वकील काय म्हणाले?
न्यायालयातील सुनावणी झाल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “न्यायालयाने पाच दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी मोहम्मद शेहजाद याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच आरोपी बांगलादेशी आहे, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. तसेच या प्रकरणात कोणताही आंतरराष्ट्रीय संबंध नाही. आरोपी शहजाद हा सात वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून मुंबईत राहत आहे. मात्र, मोहम्मद शेहजाद हा आधी बांगलादेशमध्ये राहत होता. आता तो मुंबईत राहत आहे. या संपूर्ण प्रकरणात कोणताही आंतरराष्ट्रीय मुद्दा दिसत नाही.”
आरोपीला पकडण्यासाठी १०० पोलीस कार्यरत
आरोपीला पकडण्यासाठी तब्बल १०० पोलीस कार्यरत होते. सैफ याच्यावरील हल्ल्यानंतर मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेची विविध पथके स्थापन करण्यात आली होती. आरोपीला ठाण्यातील कासारवडीवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रविवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. तेथे आरोपी हिरानंदानी इस्टेट येथील झाडीमध्ये लपून बसला होता. अखेर त्याला ताब्यात घेऊन वांद्रे येथे आणण्यात आले. त्याला सुरुवातीला चेंबूर पोलीस ठाण्यात व त्यानंतर खार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. दरम्यान आरोपी शहजाद हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. बांगलादेशातून मुंबईत तो आला होता. मुंबईत त्याच्यासोबत राहणाऱ्या दोघांची शनिवारी गुन्हे शाखेने चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपी मुंबईत हाऊसकिंपींग एजन्सीमध्ये कामाला होता. आरोपीकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे त्याच्याविरोधात पारपत्र कायदा व परकीय नागरिक कायद्याअंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली आहे. आरोपी पूर्वी ठाण्यातील हॉटेलमध्ये कामाला होता.